दिनांक :- २९/०७/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज,भिवंडी :- भिवंडी शहर हे कामगारांचे आणि उद्योगनगरी म्हणून ओळखले जाते. देशभरातून पोटापाण्यासाठी आलेल्या लूम कामगारांच्या हक्काच्या घराची गरज ओळखून या भागात गृहनिर्माण प्रकल्प, चाळी आणि इमारतींचे पेव फुटले आहे. मात्र, याच गरजेचा गैरफायदा घेत भिवंडीत सध्या ‘भूमाफिया’ आणि अवैध बांधकाम करणाऱ्यांची एक मोठी आणि धोकादायक गँग सक्रिय झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या अवैध बांधकामांना भिवंडी महानगरपालिकेच्या ०५ हि प्रभागातील बीट निरीक्षकांचे थेट अभय असल्याचे समोर आले असून, या माध्यमातून दरमहा लाखो-कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल आणि लाचखोरी सुरू असल्याचा खळबळजनक आरोप आता होत आहे.

अवैध मुख्य बिल्डरांना पाठीशी का घातले जाते?

भिवंडी महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पालिकेचे अधिकारी केवळ जागा मालकाला कागदोपत्री ‘एमआरटीपी’ (MRTP) कायद्यान्वये नोटीस बजावतात. मात्र, जो मुख्य बिल्डर किंवा भूमाफिया प्रत्यक्षपणे पैशांची गुंतवणूक करून हे अवैध बांधकाम उभे करतो, त्याला ही नोटीस का दिली जात नाही? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. बिल्डरांना वाचवण्यासाठीच हा कायद्याचा पळवाटांचा खेळ सुरू आहे का, अशी शंका उपस्थित होत आहे.

एका विभागात तीन-तीन निरीक्षक, मग काम काय?

भिवंडी शहरातील एकूण पाच विभागांमध्ये अवैध बांधकामांवर लक्ष ठेवण्यासाठी बीट निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियमानुसार एका विभागात ०१ बीट निरीक्षक असतो या ठिकाणी दोन किंवा तीन बीट निरीक्षक कार्यरत आहेत. जर एकाच विभागात तीन-तीन बीट निरीक्षक तैनात आहेत, तरीही डोळ्यांदेखत हजारो स्क्वेअर फुटांची अवैध बांधकामे कशी उभी राहतात? हे तीन बीट निरीक्षक नक्की काय काम करतात, की फक्त हप्तेखोरी वसुलीत मग्न असतात, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
संशयाच्या भोवऱ्यात असलेले बीट निरीक्षक आणि मालमत्तेची चौकशीची मागणी:

भिवंडीतील सुज्ञ नागरिकांनी दिलेल्या तक्रारींनुसार, काही ठराविक प्रभाग आणि बीट निरीक्षकांच्या भूमिकेवर गंभीर संशय व्यक्त केला जात आहे:
प्रभाग क्रमांक १: रमाकांत म्हात्रे, रवींद्र जाधव
प्रभाग क्रमांक २: धनराज पाटील (उर्फ छोटू पाटील), आकाश भोईर
प्रभाग क्रमांक ३: संदीप जाधव, नारायण पाटील, सुरज गायकवाड
प्रभाग क्रमांक ४: अमोल वारकडे

या सर्व बीट निरीक्षकांच्या बँक खात्यांची, त्यांच्या बेनामी मालमत्तेची आणि त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांची एसीबी (ACB) किंवा उच्चस्तरीय समितीमार्फत कठोर चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच, अवैध बांधकाम करणारे मुख्य बिल्डर आणि त्यांचे दलाल यांच्यासोबत या बीट निरीक्षकांचे काय संबंध आहेत, हे शोधण्यासाठी त्यांचे कॉल डिटेल्स (CDR) आणि मोबाईल संभाषणे तपासणे गरजेचे झाले आहे.

साखळी थेट आयुक्त, उपायुक्तांपर्यंत?

बीट निरीक्षकांची ही हिंमत पाहता, या भ्रष्टाचाराचे धागेदोरे भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त आणि उपायुक्तांपर्यंत तर पोहोचलेले नाहीत ना? ही भ्रष्टाचाराची साखळी नेमकी कुठपर्यंत जाते, याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण बीट निरीक्षक वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अवैध बांधकामांची खरी माहिती पोहोचूच देत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

‘गर्जा महाराष्ट्र’ची गोपनीय टीम मैदानात!

या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल ‘गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल’चे मुख्य संपादक तथा मंत्रालय विधीमंडळाचे वरिष्ठ पत्रकार श्री. अनिलभाऊ महाजन यांनी घेतली आहे. मुंबई फोर्ट येथील मुख्य कार्यालयात भिवंडीतील नागरिकांनी पुराव्यांसह तक्रारी दाखल केल्यानंतर, अनिलभाऊ महाजन यांनी या बातमीचे गांभीर्य ओळखून ती स्थानिक पातळीवर व डिजिटल पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

या महाघोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी ‘गर्जा महाराष्ट्र न्यूज’ने आपली एक विशेष गोपनीय टीम (Secret Investigation Team) भिवंडी शहरात तैनात केली आहे. ही टीम सध्या गुप्तपणे माहिती गोळा करत असून लवकरच अवैध बांधकामांचे दलाल, बीट निरीक्षकांचे कॉल रेकॉर्ड्स, प्रभाग अधिकाऱ्यांचे साटेलोटे आणि आयुक्त-उपआयुक्तांची यामध्ये असलेली कथित भागीदारी, या संपूर्ण प्रकरणाचे ‘ऑपरेशन भिवंडी’ अंतर्गत सविस्तर आणि पुराव्यांसह वृत्त प्रसिद्ध करणार आहे.

या सर्व बीट निरीक्षकांपैकी दोन बीट निरीक्षक महापालिकेच्या एका प्रमुख अधिकाऱ्याला दिवसाला संपूर्ण भिवंडीतील अवैध बांधकामांचे दररोज 10 लाख रुपये कलेक्शन करून देत असल्याची दबक्या आवाजात भिवंडी शहरात प्रशासकीय वर्गामध्ये चर्चा आहे मग तो प्रमुख अधिकारी कोण याबाबत ‘गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे टीम लवकरच शोधून काढणार आहे.

या अवैध बांधकामांना बळ देणारे भ्रष्ट बिट निरीक्षक यांच्या बाबत सामाजिक नेते मंत्रालय विधिमंडळाची वरिष्ठ पत्रकार अनिल महाजन लवकरच याबाबत नगर विकास प्रधान सचिव, नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य, भिवंडी मनपा आयुक्त अनमोल सागर यांची भेट घेऊन सविस्तर तक्रार दाखल करण्यासाठी भेट घेणार आहेत.

भिवंडीला भूमाफियांच्या विळख्यातून सोडवण्यासाठी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बुरखा फाडण्यासाठी ‘गर्जा महाराष्ट्र’चा हा लढा सुरूच राहील!

Share.