दिनांक :१२ सप्टेंबर २०२६, गर्जा महाराष्ट्र न्युज,सांगली/खानापूर प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार “महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान” खानापूर तालुक्यात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत तालुक्यातील महसूल न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या महसुली दाव्यांचा परस्पर सामंजस्याने व तडजोडीने जलदगतीने निपटारा करण्यासाठी महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.
खानापूर तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी स्तरावर दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार असून, तहसीलदार स्तरावरील महसूल लोकअदालत दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, खानापूर (विटा) येथे आयोजित करण्यात येणार आहे.
या लोकअदालतीमध्ये महसूल न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या पात्र प्रकरणांमधील पक्षकारांना परस्पर संमती, सामंजस्य व तडजोडीच्या माध्यमातून प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे पक्षकारांचा वेळ व खर्च वाचण्यास तसेच दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या महसुली वादांना सामंजस्याने पूर्णविराम देण्यास मदत होणार आहे.
खानापूर तालुक्यातील महसूल न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या महसुली प्रकरणांतील ( पाणंद रस्ता प्रकरण, ,७/१२ नोंद वाद इत्यादी) सर्व संबंधित पक्षकारांनी या महसूल लोकअदालतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील कार्यालय, खानापूर यांच्यामार्फत करण्यात येत आहे.
आपले प्रकरण तडजोडीने निकाली काढण्याची इच्छा असलेल्या पक्षकारांनी संबंधित मंडळ अधिकारी कार्यालय अथवा तहसील कार्यालय, खानापूर येथे संपर्क साधून आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी.
“प्रलंबित महसुली प्रकरणे तडजोडीने मिटवा – वेळ वाचवा, न्याय मिळवा!”
जलद निपटारा • सामंजस्य • तडजोड • सर्वांसाठी न्याय

