दिनांक :-१०-०९-२०२६,गर्जा महाराष्ट्र न्युज,सांगली/खानापूर प्रतिनिधी : खानापूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत आमदार सुहास बाबर यांच्या माध्यमातून मांजर्डे येथे कबड्डी मॅट व बस थांबा, तसेच नरसेवाडी येथे घोटी–नरसेवाडी–पेड–मोराळे रस्ता आणि ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सभा मंडप या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.
ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, शिक्षण व आरोग्य या मूलभूत सुविधा सक्षम करण्याबरोबरच युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणे आणि नागरिकांसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर आमदार सुहास बाबर यांनी विशेष भर दिला आहे. त्यातूनच मांजर्डे येथे कबड्डी खेळाडूंसाठी मॅटची सुविधा उपलब्ध होत आहे. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना सरावासाठी चांगले व्यासपीठ मिळणार असून, त्यांच्या क्रीडा कौशल्याला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
यावेळी मांजर्डे येथे सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुलभ होण्याच्या दृष्टीने बस थांबा उभारणीच्या कामाचेही उद्घाटन करण्यात आले.
तसेच नरसेवाडी येथे घोटी–नरसेवाडी–पेड–मोराळे रस्त्याच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. या मार्गामुळे परिसरातील गावांची परस्पर जोडणी अधिक मजबूत होणार असून शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसेच नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे. यासोबतच नरसेवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सभा मंडप बांधण्याच्या कामाचेही उद्घाटन करण्यात आले. ग्रामस्थांच्या विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी या सभा मंडपाचा उपयोग होणार असून, गावातील नागरिकांना उपक्रमासाठी आवश्यक सार्वजनिक जागा उपलब्ध होणार आहे.
या उद्घाटनप्रसंगी आमदार सुहास बाबर म्हणाले, ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना योग्य सुविधा मिळाल्यास ते तालुका, जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करू शकतात. त्यामुळे गावागावातील खेळाडूंना आवश्यक त्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. युवकांमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी, त्यांना सरावासाठी चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि ग्रामीण भागातील प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. विकासकामे करताना मूलभूत सुविधांसोबत युवकांचे भवितव्य घडविणाऱ्या क्रीडा सुविधांनाही प्राधान्य दिले पाहिजे.
यावेळी जि. प. सदस्य मोहन नाना पाटील, जि. प. माजी सभापती कमलताई पाटील, मोहन अण्णा पाटील, रामभाऊ जाधव, प्रभाकर काका पाटील, सौरभ पाटील, विनायक तात्या मोहिते, मधुकर काका पाटील, रमेश जाधव, कुमार जाधव, सुशांत पाटील, उत्तम तात्या मोहिते, किसन अप्पा मोहिते, दिलीप मोहिते, ज्ञानेश्वर मंडले, दत्तात्रय सगरे, गणेश मोहिते, मच्छिंद्र जाधव, विजय जाधव,जयसिंग तात्या जाधव, भीमराव जाधव, शितल जाधव, उमेश मोहिते, सावकारबुवा जाधव, बजरंगशेठ जाधव, मोहन साळुंखे, अमितकुमार पाटील, दिनकर मोहिते, पंढरीनाथ मोहिते यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, नागरिक तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

