दिनांक ०८/०९/२०२६,गर्जा महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी, लखनऊ:-उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे माळी, सैनी, कुशवाह, मौर्य आणि सर्व ओबीसी समाजाचा भव्य ‘अति मागासवर्गीय महामेळावा उत्साहात पार पडला. या संमेलनाला समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि मुंबईचे ओबीसी नेते तथा महाराष्ट्र माळी समाज महासंघ हाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सुमारे ५ ते १० हजार नागरिकांच्या विक्रमी उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्यात माळी-सैनी समाजाच्या विविध पोटजातींचे प्रतिनिधी व दिग्गज नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अनिल महाजन यांची महत्त्वपूर्ण मागणी व राजकीय चर्चा
मेळाव्यातील आपल्या भाषणात आणि अखिलेश यादव यांच्याशी झालेल्या वन-टू-वन चर्चेत अनिल महाजन यांनी ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर परखड विचार मांडले.”उत्तर प्रदेशमध्ये माळी, मौर्य आणि सैनी समाजाला योग्य राजकीय भागीदारी मिळायला हवी. आगामी निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षाने या समाजाला जास्तीत जास्त उमेदवारी (तिकीट) दिली पाहिजे,” अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
तसेच संसदेमध्ये (पार्लमेंट) जातीय जनगणनेवर आधारित सखोल चर्चा करून ओबीसी समाजाला पूर्ण हक्काचे आरक्षण मिळवून देण्याची विनंती त्यांनी अखिलेश यादव यांना केली. पुढे बोलताना महाजन म्हणाले की, “ओबीसी समाजाच्या तरुणांना शिक्षणासाठी सध्या मिळणारा सरकारी निधी अत्यंत तोकडा आहे. त्यामुळे तरुणांच्या शिक्षणासाठी भरीव आणि योग्य निधीची तरतूद करावी, तसेच देशातील प्रत्येक राज्यात ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाची (हॉस्टेल) उभारणी करावी. हा मुद्दा आपण संसदेत आणि सरकारसमोर ठामपणे मांडावा,” असे आवाहन अनिलभाऊ महाजन यांनी अखिलेश यादव यांना केले.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
मुरादाबाद येथील माळी-सैनी समाजाचे नेते जे.पी. सैनी यांनी या महामेळाव्याचे यशस्वी आयोजन केले होते. या संमेलनाला उत्तर प्रदेशसह विविध राज्यांमधून समाजातील प्रमुख प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींनी हजेरी लावली. यामध्ये प्रामुख्याने:
* बाबू सिंग कुशवाह (खासदार, जौनपूर)
* दिवेश शाक्य (खासदार, एटा)
* नीरज मौर्य (खासदार, आंवला)
* रामावतार सैनी (आमदार, नजीराबाद विधानसभा, बिजनोर)
* मिलिंद सैनी (ओबीसी वक्ता, राजस्थान)
यांसह माळी, सैनी, शाक्य, मौर्य समाजाचे शेकडो मानकरी व हजारो समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अति मागासवर्गीय समाजाच्या हक्कासाठी, शिक्षणासाठी आणि राजकीय सत्तेत वाटा मिळवण्यासाठी हा महामेळावा अत्यंत दिशादर्शक ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

