दिनांक :०१/१०/२०२६, गर्जा महाराष्ट्र न्युज,प्रतिनिधी :- साक्री, पिंपळनेर आणि धुळे तालुका तहसील हद्दीतील महामार्गांवरील ढाब्यांवर सध्या अवैध आणि चोरीचे धंदे उघडपणे सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महामार्गावरून जाणाऱ्या टँकर चालकांशी हातमिळवणी करून केमिकल, ऑइल, बायोडिझेल, फर्नेस ऑइल, पेट्रोल तसेच एलपीजी गॅस रिफिलिंगचा मोठा गोरखधंदा चालवला जात असून, याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

विशेषतः गुजरातकडे जाणाऱ्या हायवेवर साक्री, दहिवेल व पिंपळनेर परिसरात अनेक ढाब्यांच्या आडोशाने हे रॅकेट कार्यरत आहे. या बेकायदेशीर व्यवसायांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात येथील काही संशयित आणि स्थानिक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. या माध्यमातून रोज लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला जात असून, शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. तसेच ज्वलनशील पदार्थांच्या अवैध साठवणुकीमुळे महामार्गावर मोठ्या अपघाताचा आणि सुरक्षेचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

अवैध धंद्यांची प्रमुख ठिकाणे आणि समोर आलेली नावे:
१. रामदेव बाबा ढाबा परिसर (भदाणे गावाच्या पुढील बाजूस): नितीन गावडे नामक व्यक्तीकडून चोरीचा अवैध व्यवसाय.
२. भदाणे गावाच्या पुलाच्या पुढे (धुळे तालुका हद्द): राजू अहिरे नामक व्यक्तीकडून कास्टिक हायड्रोजन चोरीचा व्यवसाय.
३. वीर पंजाब हॉटेल परिसर: स्थानिक व्यक्तींकडून केमिकल चोरीचा गोरखधंदा.
४. सातबारा (शगुन) हॉटेल परिसर: गुजरातमधील व्यक्तींकडून खाद्यतेलाची (गोडेतेल) मोठ्या प्रमाणावर चोरी.
५. हॉटेल रामदेव रायका ढाबा (गौरी पेट्रोल पंपाजवळ): ऑइल आणि एलपीजी गॅस रिफिलिंगचा बेकायदेशीर धंदा.
६. हॉटेल रामदेव बाबा ढाबा: बबलू शेख व शैलू यादव यांच्याकडून केमिकल व बायोडिझेल पॉईंट चालवला जात असल्याचा आरोप.
७. साईबाबा पेट्रोल पंपाजवळ (दहिवेल गावाच्या पुढे): नाव नसलेल्या ढाब्याच्या मागे राजू अहिरे याच्याकडून हायड्रोजन व कास्टिक रसायनांची चोरी.
८. चांदणी हॉटेल परिसर (दहिवेल हद्द, साक्री): हुसेनभाई नामक व्यक्तीकडून बायोडिझेल पॉईंटचा बेकायदेशीर कारभार.
९. पंजाब खालसा ढाबा परिसर (साक्री-पिंपळनेर हद्द): बायोडिझेल पॉईंट आणि अवैध गॅस रिफिलिंग.

विशेष पथकामार्फत धाडी टाकण्याची मागणी
या गंभीर प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण आहे. पोलीस आणि महसूल प्रशासनाने या सर्व संशयास्पद ठिकाणांची तात्काळ दखल घेऊन विशेष पथकांमार्फत धाडी टाकाव्यात, बेकायदेशीर साठे जप्त करून संबंधित गुन्हेगारांवर कठोर गुन्हे दाखल करावेत आणि हे धंदे कायमचे बंद करावेत, अशी तीव्र मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Share.