दिनांक :- २३/०६/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज,भिवंडी :- मुंबईचे प्रवेशद्वार आणि लॉजिस्टिक हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात सध्या अनधिकृत बांगलादेशी महिला आणि मुलींच्या वास्तव्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर कापड उद्योग (लूम) व कामगार वर्ग असल्याने या गर्दीचा फायदा घेत बांगलादेशी महिलांना बेकायदेशीरपणे आश्रय दिला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे केवळ साधे वास्तव्य नसून यामागे एक मोठे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबईत पुरवठा
मिळालेल्या माहितीनुसार, दलाल (एजंट) प्रथम या बांगलादेशी महिलांना व मुलींना भिवंडीत आणतात. त्यानंतर काही स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांचे बनावट आधार कार्ड, रेशन कार्ड आणि इतर खोटी कागदपत्रे तयार केली जातात. एकदा ही कागदपत्रे तयार झाली की, त्यांना मुंबई, नवी मुंबई, अंधेरी, वसई-विरार, बोरीवली, जोगेश्वरी, ठाणे, मीरा-भाईंदर आणि उल्हासनगर यांसारख्या विविध शहरांमध्ये छोट्या-मोठ्या कामांच्या बहाण्याने वास्तव्यासाठी पाठवले जाते.काही काळापूर्वी अशाच नऊ बांगलादेशी महिलांचे रेशन कार्ड बनवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता, मात्र तो लक्षात येताच तात्काळ रद्द करण्यात आला. यावरून या रॅकेटचे मूळ भिवंडीत किती खोलवर रुजले आहे, हे स्पष्ट होते.

मोठ्या दलालांवर कारवाई कधी?
भिवंडीतील स्थानिक पोलीस त्यांच्या पातळीवर बांगलादेशी नागरिकांवर अधूनमधून कारवाई करत असतात, परंतु या रॅकेटचे मुख्य सूत्रधार अजूनही पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मोकळे फिरत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटमधील एक प्रमुख संशयित एजंट खुलेआम सक्रिय असून, त्याचे अनेक ठिकाणी लागेबांधे आहेत. या मोठ्या दलालांच्या मुसक्या आवळल्याशिवाय हे रॅकेट मुळापासून उखडून टाकणे शक्य नाही, अशी मागणी जोर धरत आहे.

‘कोंबिंग ऑपरेशन’ची मागणी
भिवंडी शहर व ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यात असलेल्या चाळी, बैठी घरे आणि इमारतींमध्ये दहशतवादी विरोधी पथक (ATS) आणि स्पेशल क्राईम ब्रँच यांनी संयुक्तपणे ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवावे, अशी मागणी सुजाण नागरिकांमधून होत आहे. अशा प्रकारची मोठी कारवाई झाल्यासच भिवंडीतील गुन्हेगारीला आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही अनेक सामाजिक नेते, संघटना आणि पत्रकारांनी या गंभीर मुद्द्यावर आवाज उठवला आहे.

या सर्व प्रकरणाची गंभीर दखल सामाजिक नेते व मंत्रालय विधिमंडळाचे वरिष्ठ पत्रकार तसेच विविध सामाजिक संस्थांचे राज्यअध्यक्ष श्री.अनिलभाऊ महाजन यांनी घेतली आहे. भिवंडीतील या अनधिकृत वास्तव्याबाबत आणि रॅकेटबाबत ते लवकरच राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, विधानसभा अध्यक्ष, पोलीस महासंचालक आणि ठाणे पोलीस आयुक्त यांची भेट घेणार आहेत. या रॅकेटचा पर्दाफाश करून ठोस व कडक कारवाई करण्यात यावी, अशी अधिकृत विनंती ते प्रशासनाला करणार आहेत.

Share.