दिनांक :- २४/०७/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज,भिवंडी :- भिवंडी शहरातील निजामपुरा पोलीस स्टेशन व कोनगाव पोलीस स्टेशन हद्दीतील नदी-नाले आणि पाणवठ्यांमध्ये काही कंपन्यांकडून स्थानिक समाजकंटकांच्या संगनमताने रात्रीच्या वेळी टँकरद्वारे विषारी औद्योगिक केमिकल व रासायनिक सांडपाणी अवैधरित्या सोडले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकारामुळे परिसरातील पर्यावरणास मोठा धोका निर्माण झाला असून नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दररोज रात्री उशिरा काही टँकर नदी-नाल्यांच्या परिसरात येऊन विषारी रासायनिक द्रव सोडतात. या रसायनांमधून तीव्र दुर्गंधी पसरत असून परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. तसेच नदी-नाल्यांचे पाणी प्रदूषित होत असल्याने पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नदी-नाल्यांमध्ये औद्योगिक केमिकलची अशा प्रकारे विल्हेवाट लावणे हे पर्यावरण संरक्षणाच्या नियमांचे उल्लंघन असून हा गंभीर कायदेशीर गुन्हा असल्याचे पर्यावरण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित टँकरधारक, संबंधित कंपन्या तसेच या प्रकारात सहभागी असलेल्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

यासंदर्भात संबंधित पोलीस प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) तसेच जिल्हा प्रशासन यांनी संयुक्त तपास मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच नदी-नाल्यांवर रात्रीच्या वेळी विशेष गस्त वाढवून अशा प्रकारांना तातडीने आळा घालावा, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

अवैध रित्या केमिकल व विषारी रसायन्स कोनगाव, निजामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील नदी-नाल्यांमध्ये सोडले जात आहे. त्यावर संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करणे बाबत.पोलीस उपायुक्त भिवंडी शहर, भिवंडी महानगर पालिका आयुक्त ,तसेच प्रदूषण महामंडळ कल्याण ऑफिसर यांच्याकडे वरिष्ठ पत्रकार समाजसेवक ग्रीन इंडिया प्रदूषण नियंत्रक फाउंडेशनचे चेअरमन श्री.अनिल महाजन यांनी लेखी पत्र देऊन कळवले आहे. तात्काळ कारवाई न झाल्यास मंत्रालय स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन संबंधित विषय वरिष्ठांच्या लक्षात आणून देणार असल्याचे सांगितले आहे.

Share.