दिनांक :- १३/०७/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज, उल्हासनगर, प्रतिनिधी :- प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत संतोष नगर परिसरातील काही बांधकामे बाधित होणार असल्याच्या नोटिसांनंतर स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर दिनांक १२ जुलै २०२६ रोजी विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रदीप गरड यांच्या पुढाकाराने स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत नागरिकांनी आपल्या शंका, चिंता व मागण्या मांडल्या.
बैठकीदरम्यान शिवसेनेचे नगरसेवक श्री.अरुण आशान यांनी नागरिकांना आश्वासन देताना सांगितले की, “संतोष नगर परिसरातील कोणत्याही नागरिकावर अन्याय किंवा कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ दिला जाणार नाही. नागरिकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
या बैठकीस शिवसेना शहर प्रमुख श्री. सचिन कदम, सामाजिक कार्यकर्ते श्री. नितीन सपकाळ, श्री. निलेश बोबडे, श्री. निखिल पाटील,सुरज कारकर तसेच यांच्यासह संतोष नगर परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. बैठकीत नागरिकांच्या विविध शंका व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
“आधीचा आराखडा बदलून आमच्या घरांपासूनच योजनेची अंमलबजावणी का सुरू करण्यात आली? या निर्णयामागचा सूत्रधार कोण?” असा सवाल संतोष नगर परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला असून, प्रशासनाने याबाबत पारदर्शक स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी उपस्थितांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान स्थानिक रहिवाशांवर अन्याय होऊ नये, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी नागरिकांना विश्वासात घेण्यात यावे, योग्य पुनर्वसनाची हमी द्यावी आणि पारदर्शक प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी केली.
विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रदीप गरड यांनी नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी आवश्यक त्या सर्व स्तरांवर पाठपुरावा केला जाईल व स्थानिकांच्या हिताला बाधा येऊ दिली जाणार नाही, अशी भूमिका यावेळी मांडली.

