दिनांक :- ११/०७/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज, पन्हाळा (जि. कोल्हापूर) : पन्हाळा तालुक्यातील सातार्डे गावात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीच्या घटनांबरोबरच चोरट्यांनी गावातून पळून जाताना एका नागरिकावर चाकूने हल्ला केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि रात्रीच्या गस्तीवर ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सातार्डे गावातील बंद असलेल्या घरांना लक्ष्य केले. चोरट्यांनी दोन घरांची कुलपे तोडून सुमारे ४१ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केला, तर तिसऱ्या घरात चोरीचा प्रयत्न केला. कुलूप लावलेली घरे अचूकपणे निवडण्यात आल्याने चोरट्यांनी यापूर्वी गावाची रेकी केली असावी, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.
चोरी करून पळून जात असताना चोरट्यांचा सामना अवधूत अशोक भाट (वय ३७, रा. काळाचौकी, मुंबई) यांच्याशी झाला. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या हातावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना गंभीर जखमी केले आणि घटनास्थळावरून पसार झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय देवानंद दमे हे मित्र अवधूत भाट यांच्यासोबत कार्यक्रमानिमित्त सातार्डे येथे आले होते. मध्यरात्रीच्या सुमारास एका घराचा दरवाजा उघडा व घरात उजेड दिसल्याने त्यांना संशय आला. त्यांनी आवाज दिल्यानंतर चोरटे हातात धारदार शस्त्रे घेऊन आरडाओरड करत बाहेर आले आणि त्यांनी भाट यांच्यावर हल्ला केला.
या घटनेत अक्षय दमे यांच्या घरातून सुमारे १८ हजार रुपयांचा चांदीचा ऐवज चोरीला गेला. तसेच लाड गल्लीतील तुकाराम शिंदे यांच्या घराचे कुलूप फोडून २३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले. शाळेच्या गल्लीतील दत्तात्रय हांडे यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न झाला; मात्र घर बंद असल्याने चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.
दरम्यान, मागील तीन-चार दिवसांपूर्वी गावात काही अनोळखी इसम वास्तव्यास आल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळत आहे. या व्यक्तींनी गावाची पाहणी करूनच चोरी केली असावी का, असा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. गावातील संशयास्पद हालचालींकडे प्रशासनाचे लक्ष होते का, असा सवाल उपस्थित होत आहे.
एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी, त्यात नागरिकावर झालेला चाकू हल्ला यामुळे सातार्डे गावातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास करून चोरट्यांना जेरबंद करावे तसेच गावातील रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
गावकऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलणार का, असा प्रश्न आता सातार्डेकरांसमोर उभा आहे.
अक्षय देवानंद दमे यांच्या फिर्यादीवरून पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पन्हाळा पोलीस करत आहेत.

