विरार येथे अवैद्य केमिकल पासून ताडी बनविण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू.

बेकायदेशीर ताडी निर्मितीच्या कथित गोडाऊनवर दारूबंदी विभाग कारवाई कधी करणार?

एका परवान्यावर पाच ते सहा ताडी विक्री केंद्रे सुरू असल्याचा आरोप;सखोल चौकशीची मागणी

दिनांक – २३/०७/२०२६ विरार/पालघर ,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- विरार पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात चालविल्या जाणाऱ्या ताडी/माडी विक्री केंद्रांबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या असून, परवाना अटींचे उल्लंघन, प्रशासनाची दिशाभूल तसेच सार्वजनिक आरोग्याशी संबंधित बाबींची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित विक्री केंद्रांवर अधिकृत नामफलक, परवाना क्रमांक, परवान्याच्या अटी तसेच कायद्यानुसार प्रदर्शित करावयाची आवश्यक माहिती लावण्यात आलेली नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे सदर केंद्रे कायदेशीर परवान्याच्या अधीन कार्यरत आहेत की नाहीत, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

याशिवाय, ताडी काढणीचा अधिकृत कालावधी संपल्यानंतरही विक्री सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच नैसर्गिक ताडीऐवजी इतर संशयास्पद पदार्थ मिसळून पेय विकले जात असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी संबंधित ताडीचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेत पाठवून वैज्ञानिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

तसेच एका परवान्याच्या आधारे पाच ते सहा स्वतंत्र ताडी/माडी विक्री केंद्रे चालविली जात असल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब खरी असल्यास महाराष्ट्र ताडी दुकाने (परवाना) नियम, १९६८, महाराष्ट्र ताडी वृक्ष रस काढणी नियम, १९६८ तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ मधील संबंधित तरतुदींचे उल्लंघन झाले आहे का, याची चौकशी करावी.

दरम्यान, वसई-विरार शहरात ताडीचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत असून काही अधिकृत ताडी विक्री केंद्रांमध्ये भेसळयुक्त ताडी विक्री होत असल्याच्या तक्रारी विविध स्तरावर प्राप्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे. काही नागरिकांनी ताडीत नशा आणणारे पदार्थ मिसळले जात असल्याचा संशय व्यक्त केला असून, यामुळे विशेषतः कामगार वर्गाच्या आरोग्यावर आणि सामाजिक जीवनावर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने वसई-विरारमधील ताडी विक्री केंद्रांवर अचानक तपासणी मोहीम राबवून ताडीचे नमुने तातडीने अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

मंत्रालयाचे वरिष्ठ पत्रकार तथा गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक श्री. अनिलभाऊ महाजन यांच्या कार्यालयात वसई-विरार परिसरातील ताडी विक्री केंद्रांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या संदर्भात गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलने वृत्त प्रकाशित केल्याचे तसेच राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांकडे ई-मेलद्वारे तक्रार सादर केल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने वस्तुस्थितीची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच चौकशीदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Share.