दिनांक – ०१/०९/२०२६ ,गर्जा महाराष्ट्र न्यूज विशेष वृत्त: मागच्या वर्षी चारधाम यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर, या वर्षी २०२६ मध्ये आई-वडिलांना नेपाळची आंतरराष्ट्रीय वारी घडवून काठमांडू येथील प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराचे सुखरूप दर्शन घडवण्याचे भाग्य लाभले, अशी भावना अनिल महाजन यांनी व्यक्त केली. आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती असून त्यांचा हा हसरा चेहरा असाच कायम राहावा, अशी प्रार्थना त्यांनी प्रभू चरणी केली आहे.

अतिशय हलाखीच्या आणि गरिबीच्या परिस्थितीत काबाडकष्ट करून आई-वडिलांनी आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून मुलांना लहानाचे मोठे केले. स्वतःच्या सुखाचा त्याग करत, अगदी आईने स्वतः उपाशी राहून मुलांना वाढवले. आयुष्यात कधीही विमानात न बसलेल्या आणि आंतरराष्ट्रीय सफर न केलेल्या आपल्या साध्या कुटुंबातील आई-वडिलांना विमानाने नेपाळ टूर घडवून आणत अनिल महाजन यांनी आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण फुलवले.

“पैसा पुन्हा कमवता येईल, पण आई-वडिलांचे वय आणि वेळ निघून जाईल”
संसाराच्या गाड्यात आणि वाढत्या खर्चात व्यस्त राहणाऱ्या आजच्या तरुण पिढीचे कान उघडताना अनिल महाजन म्हणाले, “आपण ‘आज करू, उद्या करू’ म्हणत वेळ घालवतो. पण वय वाढल्यावर आई-वडिलांचे हात-पाय थकून गेले, तर आपण त्यांना कसे फिरवणार? पैसा आयुष्यात पुन्हा कमवता येतो, पण निघून गेलेली वेळ आणि आई-वडिलांचे वय परत येत नाही. त्यामुळे ते सुखरूप आणि कार्यक्षम आहेत तोपर्यंतच त्यांना देवदर्शन घडवा, आपल्या परिवारासोबत आणि नातवंडांसोबत त्यांना फिरायला घेऊन जा.”

“आई-वडिलांचा आशीर्वाद हीच सर्वात मोठी कमाई”
सध्याच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले, “जगात एकच नातं असं आहे, जे कोणत्याही स्वार्थाशिवाय आणि फायद्याशिवाय आपल्यावर प्रेम करतं—ते म्हणजे आपले आई-वडील. लग्न झाल्यानंतर किंवा करिअरच्या शर्यतीत मुले बदलतात, परदेशात जातात किंवा आई-वडिलांची लाज बाळगतात. पण आई-वडिलांचा आदर न करणाऱ्यांना समाज आणि परमेश्वर कधीही माफ करणार नाही.”

तरुण बांधवांना नम्र आवाहन:
वेळ आणि काळजी: कामाच्या व्यस्ततेतून आठवड्यातून किंवा महिन्यातून किमान एकदा तरी आई-वडिलांसोबत वेळ घालवा.
आनंदाचे क्षण: त्यांच्या आवडी-निवडी जपा, त्यांना आवडणारे पदार्थ आणून द्या किंवा चांगल्या ठिकाणी जेवायला घेऊन जा.त्यांची तब्बेतिची योग्य काळजी घ्या वेळेवर डॉक्टर कडे घेऊन जा औषधी वेळेवर आणा त्यांच्या
एकत्रित कुटुंब: पत्नी, मुले किंवा करिअर सांभाळताना साध्या राहणीमानाच्या आई-वडिलांना कधीही दूर करू नका.

आई-वडिलांची छत्रछाया आणि त्यांचा आशीर्वाद पाठीशी असेल, तर आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही, असा मोलाचा सल्ला अनिल महाजन यांनी या वेळी दिला. त्यांच्या या संवेदनशील आणि सामाजिक संदेशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Share.