दिनांक – २८/०१/२०२६ पुणे/बारामती,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी बारामतीला येत असताना त्यांच्या चार्टर्ड विमानाला (Learjet 45) हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील दोन वैमानिक आणि इतर दोन सहकाऱ्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
नेमके काय घडले? मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे मुंबईहून बारामतीसाठी सकाळी ८ च्या सुमारास निघाले होते. बारामती विमानतळावर सकाळी ८:४५ च्या सुमारास विमान लँडिंग करत असताना तांत्रिक बिघाडामुळे धावपट्टीवरून घसरले आणि बाजूला कोसळले. विमान जमिनीवर आदळताच मोठा स्फोट झाला आणि विमानाने पेट घेतला.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेला थरारक अनुभव घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी या अपघाताचे भयानक वर्णन केले आहे. शेतात काम करणाऱ्या आणि विमानतळाच्या जवळ असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, “आम्ही विमान खाली येताना पाहिले. ते लँडिंगसाठी अप्रोच करत होते, पण अचानक ते अनियंत्रित झाले आणि जमिनीकडे झेपावले. जमिनीला स्पर्श करताच मोठा आवाज झाला आणि आगीचा भडका उडाला. विमानातून ४-५ वेळा स्फोटाचे आवाज आले. आम्ही मदतीसाठी धावलो, पण आग इतकी भीषण होती की कोणालाही बाहेर काढणे शक्य झाले नाही. डोळ्यासमोर हे सर्व घडले, आणि नंतर समजले की त्यात अजितदादा होते, हे अत्यंत वेदनादायी आहे.”
विमानाचे अवशेष आणि आग पाहून स्थानिकांनी तात्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती दिली, परंतु आगीची तीव्रता जास्त असल्याने बचावकार्यात अडथळे आले. डीजीसीए (DGCA) ने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
राजकीय वर्तुळात हळहळ अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय वर्तुळात मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री, विविध पक्षांचे नेते आणि बारामतीमधील नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

