दिनांक –२५/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या साहित्याचा समावेश असलेल्या व त्यांच्या साहित्याची समग्र समीक्षा असलेल्या ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाड्मय’च्या 18 खंडांचे प्रकाशन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मंत्रालयात झाले. मराठी भाषेच्या अभ्यासक, साहित्यिक व विद्यार्थ्यांसाठी हा अनमोल खजिना अभ्यासासाठी उपलब्ध झाला असल्याची माहिती श्री. केसरकर यांनी यावेळी दिली.
मराठी विश्वकोश मंडळाचे पहिले अध्यक्ष, प्राच्यविद्यापंडित लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यावरील ज्येष्ठ साहित्यिक व संशोधक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी तयार केलेल्या ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाड्मय’च्या 18 खंडांच्या प्रकाशन प्रसंगी खंडाचे निर्माते व संपादक डॉ. सुनीलकुमार लवटे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटील, मराठी विश्वकोश मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे, मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आदी उपस्थित होते.
शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे महाराष्ट्राचे आणि साहित्याचे वैभव होते. त्यांच्याच पुढाकारामुळे राज्याच्या विश्वकोश मंडळाची निर्मिती झाली. त्यांच्या साहित्याचा, त्या साहित्यावरील समीक्षेचा समावेश असलेला हा ठेवा ज्येष्ठ संशोधक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी 18 खंडांच्या माध्यमातून संकलित केला आहे. तर्कतीर्थ हे समीक्षक, लेखक, प्राच्यविद्यापंडित होते. त्यांनी भारतीय राज्यघटनेचे संस्कृतमध्ये भाषांतर करून मोठे कार्य केले. त्यांच्या वेगवेगळ्या साहित्य, समीक्षाबद्दल एकत्र संकलन करणे अवघड होते, परंतु डॉ. लवटे यांनी मोठ्या परिश्रमाने हे काम केले आहे.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी तयार केलेल्या विश्वकोशाची माहिती पाहण्यासाठी इंटरनेटवर सुमारे तीन कोटी लोकांनी भेट दिली आहे. सध्या अभियांत्रिकीचे शिक्षण मराठी भाषेतून सुरू झाले असून वैद्यकीय शिक्षणही लवकरच मराठी भाषेत सुरू होणार आहे. त्यामुळे नवनवीन परिभाषा व शब्दांसाठी विश्वकोश महत्त्वाचा ठरणार आहे. विश्वकोशाचे कार्य अधिक जोमाने व्हावे यासाठी २० वर्षानंतर नवीन भरती केली आहे. त्यामध्ये साहित्याचे अभ्यासक, अभ्यासू तरुणांना नेमणुका दिल्या आहेत. मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या कार्यालयाची इमारत स्वतःच्या जागेत उभारण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्याचे बांधकाम सुरू करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मराठी भाषा विभागाचा मंत्री म्हणून दोन वर्षापूर्वी कार्यभार स्विकारल्यानंतर मराठीचे वैभव वाढविण्यासाठी सर्वच मंत्रिमंडळ सदस्यांसोबत कार्यरत आहे. मराठी भाषा धोरण जाहीर केले. मराठी माणसाला अभिमान वाटेल असे मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथे भव्य असे मराठी भाषा भवन उभारण्यात येणार असून लवकरच त्याचे भूमिपूजन होणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था, भाषा संचालनालय आदींच्या कार्यालयाबरोबरच कॉन्फरन्स हॉल, म्युझियम, ऑडिटोरियम उपलब्ध असेल, असे त्यांनी सांगितले.
मराठी भाषा विभागामार्फत बाळशास्त्री जांभेकर व साने गुरुजी यांचे गाव पुस्तकाचे गाव म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कवी मंगेश पाडगावकर यांचे उभादांडा हे जन्मगाव कवितेचे गाव म्हणून एक उत्कृष्ट स्मारक म्हणून विकसित करणार आहोत. तसेच राज्यात लवकरच सहा ठिकाणी पुस्तकांचे गाव ही संकल्पना राबविणार आहोत. याशिवाय मराठीतील कवितांचे हिंदी व इंग्रजी भाषेत भाषांतर करण्याचा विचार आहे. राज्यात इयत्ता 11 वी व 12 वीमधील शिक्षणात मराठी भाषा सक्तीचा करण्यात येणार आहे. तसेच सर्व शासकीय कार्यालयात मराठीत संवाद करण्यासाठी सक्तीचे केले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.