दिनांक :१२/११/२०२६,गर्जा महाराष्ट्र न्युज,नौशाद शेख प्रतिनिधी विटा/सांगली :- स्वच्छ भारत अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये सांगली जिल्ह्यातील विटा नगरपरिषदेने देशपातळीवर ऐतिहासिक कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. २० ते ५० हजार लोकसंख्या असलेल्या नगरपरिषदांच्या गटात विटा नगरपरिषदेने अव्वल स्थान मिळवत संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. या उल्लेखनीय यशामुळे विटा शहराच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात भारताच्या राष्ट्रपती मा. द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विटा नगरपरिषदेला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्कार स्वीकारण्यासाठी नगराध्यक्षा सौ. काजल (काकी) म्हेत्रे, उपनगराध्यक्ष श्री. अमोलदादा बाबर, आरोग्य सभापती श्री. भालचंद्रभैय्या कांबळे आणि मुख्याधिकारी श्री. विक्रमसिंह पाटील (साहेब) उपस्थित होते.

एका दिवसातील नव्हे, तर सातत्यपूर्ण प्रयत्नांचे यश!

विटा नगरपरिषदेने मिळवलेले हे यश एका दिवसात साध्य झालेले नाही. शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करणे, कचरा व्यवस्थापन, नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे आणि स्वच्छ व सुंदर शहराचा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी करण्यात आलेले सातत्यपूर्ण प्रयत्न या यशामागे महत्त्वाचे ठरले आहेत.

नगरपरिषदेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी तसेच विटा शहरातील जागरूक नागरिक यांच्या सामूहिक सहभागातून ही ऐतिहासिक कामगिरी साकार झाली आहे.

देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवून विटा नगरपरिषदेने केवळ सांगली जिल्ह्याचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे. विटा शहराच्या या यशाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, स्वच्छतेच्या क्षेत्रात इतर शहरांसाठी विटा नगरपरिषद प्रेरणादायी ठरली आहे.

Share.