दिनांक :- ३०/०७/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज,भिवंडी :- भिवंडी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाविंद्रा परिसरामध्ये अवैध हुक्का पार्लर्सचा सुळसुळाट झाला असून, आता या काळ्या धंद्यांची पोलखोल करण्यासाठी मीडिया सरसावला आहे. चाविंद्रा भागातील या बेकायदेशीर हुक्का पार्लर्सचे अचूक लोकेशन, पूर्ण पत्ता आणि तिथला थेट व्हिडिओ पुरावा घेऊन गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेल’ ची टीम लवकरच प्रत्यक्ष दर्शनी लाईव्ह दाखवणार आहे. ठाणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक (ॲडिशनल एसपी) मित्तल साहेब आणि भिवंडी ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे हा थेट लाईव्ह पुरावा सोपवला जाणार असून, यामुळे भिवंडी ग्रामीणमध्ये नक्की किती हुक्के पार्लर मोठ्या प्रमाणावर हे अवैध धंदे सुरू आहेत, हे सर्वांसमोर उघड होणार आहे.

मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार, चाविंद्रा भागामध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक ढाब्यांच्या पाठीमागे आणि काही ढाब्यांच्या आत अत्यंत गुप्तपणे हे हुक्का पार्लर चालवले जात आहेत. वरून जेवणाचे ढाबे दाखवायचे आणि आतमध्ये तरुणांना हुक्क्याच्या नशेत बुडवायचे, असा हा गंभीर प्रकार राजरोसपणे सुरू आहे. या भागात तब्बल ८ ते १० हुक्का पार्लर्स रात्रभर बिंदासपणे सुरू असून यामध्ये काही स्थानिक गाववाल्यांनीही हे पार्लर सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर ढाब्यांच्या आडून सुरू असलेल्या या बेकायदेशीर कृत्यांवर भिवंडी तालुका पोलिसांची नजर का पडत नाही? हा सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे. पोलिसांना याची खरोखरच माहिती नाही, की पोलीस जाणीवपूर्वक याकडे डोळेझाक करत आहेत? ‘काही पेपर देऊन घेऊन सेटलमेंट’ करून या अवैध धंद्यांना मूक संमती दिली जात आहे का? असा थेट आणि गंभीर प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. स्थानिक पोलिसांच्या या संशयास्पद भूमिकेमुळे कायदा व सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी ओळखले जाणारे ॲडिशनल एसपी मित्तल साहेब आणि भिवंडी ग्रामीण वरिष्ठ पोलीस निरीक्षक आता ‘गर्जा महाराष्ट्र न्यूज’च्या या लाईव्ह पुराव्यानंतर काय पाऊल उचलतात? या ढाबे मालकांवर आणि हुक्का चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करून हे अड्डे उद्ध्वस्त करणार का? याकडे आता संपूर्ण भिवंडीकरांचे लक्ष लागले आहे.

Share.