दिनांक :- ३१/०७/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज, पाचोरा (विशेष प्रतिनिधी): पाचोरा शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अरुंद रस्त्यांमुळे होणारी नागरिकांची घुसमट थांबवण्यासाठी नगर परिषदेने ‘वैशिष्ट्यपूर्ण योजने’ अंतर्गत ५ कोटी रुपये खर्चून बांधलेला नवीन पूल गेल्या सहा महिन्यांपासून धूळ खात पडून आहे. हा पूल त्वरित सुरू न झाल्यास वरिष्ठ पत्रकार,सामाजिक नेते श्री.अनिल महाजन यांच्यासह स्थानिक रहिवाशांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्याने नगरपालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

शहरवासीयांची ट्रॅफिकच्या जाचातून सुटका कधी?

सध्या पाचोरा शहरातून गावातून होणाऱ्या वाहतुकीमुळे आणि अत्यंत अरुंद रस्त्यांमुळे रोजच मोठी ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण होते. विशेषतः कृष्णापुरी नदीवरील पूल आणि कृष्णापुरी भागातील रस्ता अतिशय अरुंद असल्याने येथे तासनतास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. जर पाचोरा स्मशानभूमीनजीकचा हा नवीन पूल आणि जळगाव रोडला जोडणारा रस्ता तातडीने सुरू झाला, तर कृष्णापुरी भागातील ट्रॅफिकचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच हिवरा नदी पुलावरील वाहतूकही वळवली जाऊन शहरवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

काय आहे नेमका भूसंपादनाचा पेच?

पाचोरा स्मशानभूमीच्या बाजूने जळगाव रस्त्याला कनेक्ट होणाऱ्या या ५ कोटींच्या पुलाचे काम ठेकेदाराने पूर्ण केले असून, नगरपालिकेने त्याची बिलंही अदा केली आहेत (फक्त १०% अनामत रक्कम शिल्लक आहे). हा रस्ता विकास आराखड्यात (डीपीआर) मंजूर आहे. मात्र, पुलापुढील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या भूसंपादनावरून काम अडकले आहे. बाधित शेतकरी मोबदल्यापोटी ‘नगदी रकमेची’ (कॅश) मागणी करत आहेत, तर नगरपालिका तांत्रिक कारणांमुळे ‘ हस्तांतरणीय विकास हक्क’ (TDR) देण्यावर ठाम आहे.

जळगाव रस्त्याकडून काम सुरू करणार: नगरपालिका

नगरपालिकेचे मुख्याधिकारी व रोड इंजिनिअर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही शेतकरी टीडीआरचा पर्याय स्वीकारण्यास तयार झाले आहेत. त्यामुळे जळगाव रस्त्याच्या बाजूने लवकरात लवकर काम सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे.

स्थानिक आमदार ,पाचोरा नगराध्यक्ष यांची भेट

लवकरात-लवकर हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी वरिष्ठ पत्रकार, सामाजिक नेते श्री.अनिल महाजन हे स्थानिक नागरिकांसह लवकरच स्थानिक आमदार श्री.किशोर आप्पा पाटील तसेच पाचोरा नगराध्यक्ष सौ.सुनीता किशोर पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तीन महिन्यांचा अल्टीमेटम!

संभाजीनगर, बाहेरपुरा भाग आणि परिसरातील रहिवाशांची हा रस्ता तत्काळ सुरू करण्याची जोरदार मागणी आहे.या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पत्रकार,सामाजिक नेते श्री.अनिल महाजन व स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला ३ महिन्यांचा अल्टीमेटम दिला आहे.येत्या तीन महिन्यांच्या आत नगरपालिकेने भूसंपादनाचा विषय मार्गी लावून हा पूल व रस्ता वाहतुकीसाठी खुला न केल्यास तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा सामाजिक नेते श्री.अनिल महाजन त्यांनी दिला आहे.

Share.