दिनांक :- २२/०६/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज,भिवंडी :- भिवंडी प्रभाग समिती क्रमांक ०२ अंतर्गत येणाऱ्या विविध भागांमध्ये सध्या अवैध बांधकामांनी प्रशासनाच्या नाकावर टिच्चून उच्छाद मांडला आहे. गणेश सोसायटी, रावजी नगर, सुभाष नगर, बिट चौकी ते थेट अप्सरा टॉकीज पर्यंतच्या परिसरात सर्रासपणे आणि मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर इमारतींचे बांधकाम सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पावसाळा तोंडावर आलेला असतानाही पालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याने, “भिवंडी महानगरपालिका आयुक्त कुंभकरणाच्या झोपेत आहेत का?” असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांमधून विचारला जात आहे.
पावसाळ्यात वाढली अपघातांची भीती
भिवंडी शहराचा अवैध आणि धोकादायक बांधकामांचा इतिहास अत्यंत क्लेशदायक राहिला आहे. यापूर्वी शहरात अनेक इमारती पत्त्यासारख्या कोसळून शेकडो निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता पुन्हा पावसाळ्याचे दिवस सुरू होत असतानाच, गणेश सोसायटीच्या अंतर्गतच सुमारे ५ ते ६ अजस्र बेकायदेशीर बांधकामे रात्रंदिवस वेगाने सुरू आहेत. निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करून उभारल्या जाणाऱ्या या इमारती भविष्यात मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देत आहेत.

एम.आर.टी.पी. (MRTP) अंतर्गत कारवाईची मागणी
या बेकायदेशीर चक्रव्यूहामुळे त्रस्त झालेल्या जागरूक जनतेने आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आता प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. केवळ तोंडदेखली नोटीस न बजावता, या जागामालकांवर आणि संबंधित बिल्डिंग बांधणाऱ्या कंत्राटदारांवर (ठेकेदारांवर) *’महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम’ (MRTP ACT)* अंतर्गत थेट फौजदारी गुन्हे दाखल करून मोठी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
नागरिकांचा सवाल: “प्रभाग समिती २ मधील अधिकारी आणि बीट निरीक्षकांच्या आशीर्वादाशिवाय ही बांधकामे होणे अशक्य आहे. महापालिका आयुक्त या भ्रष्ट कारभारावर आणि अनधिकृत बांधकामांवर कधी हातोडा चालवणार? की आणखी एका दुर्घटनेची आणि निष्पाप बळींची वाट पाहत आहेत?” पावसाळा पूर्णपणे सक्रिय होण्यापूर्वी गणेश सोसायटी, रावजी नगर, सुभाष नगर, बिट चौकी आणि अप्सरा टॉकीज परिसरातील या सर्व अवैध बांधकामांवर तातडीने तोडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक जनतेकडून दिला जात आहे. आता यावर पालिका आयुक्त काय पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भिवंडी महानगरपालिका प्रभाग क्रमांक २ अंतर्गत सुरू असलेल्या कथित अवैध बांधकामांवर संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांकडून तातडीने तोडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
जर संबंधित प्रभाग अधिकारी यांनी आवश्यक कारवाई केली नाही, तर गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मुख्य संपादक श्री. अनिल भाऊ महाजन हे स्थानिक नागरिकांसोबत नगर विकास विभाग तसेच नगर विकास सचिव, मंत्रालय यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत सविस्तर लेखी तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.
नागरिकांच्या तक्रारी व परिसरातील परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधित विभागाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

