दिनांक – ०६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भारताचे माजी रेल्वे आणि संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस स्मृती राष्ट्रीय पुरस्कार यंदा `मेट्रो मॅन ऑफ इंडिया’ पद्मविभूषण डॉ. ई. श्रीधरन यांना बंटर भवन, कुर्ला येथे झालेल्या शानदार सोहळ्यात जयश्रीकृष्ण परिसर प्रेमी समितीच्या वतीने माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक टी. जयाकृष्ण शेट्टी यांच्या पुढाकाराने आयोजित या सन्मान सोहळ्यात खासदार कॅप्टन ब्रिजेश चौटा, माजी खासदार गोपाळ शेट्टी तसेच देशभरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजच्या काळात मुलभूत सोयीसुविधांचे महत्व अधिक वाढले आहे. कोकण रेल्वेसारखा प्रकल्प राबविण्यासाठी जॉर्ज फर्नांडिस यांनी दिलेला पाठिंबा त्या काळात महत्वाचा होता. त्यामुळेच अनेक अशक्यप्राय पातळ्यांवर काम करणे शक्य झाले. त्यांच्या नावे मिळणारा सन्मान हा अत्यंत आनंदाचा क्षण असल्याचे ई. श्रीधरन यांनी यावेळी बोलताना सांगितले.

श्रीधरन यांनी राबविलेले कोकण रेल्वे, दिल्ली, कोची, लखनौ, जयपूर, विजयवाडा, कोईमतूर आदी ठिकाणची मेट्रो निर्मिती ही आज काळाची गरज होती. त्यावेळी घेतलेले निर्णय धाडसी आणि अचूक असल्यामुळेच आज आपला देश गतिमान झाला आहे आणि अर्थव्यवस्था बळकट करत आहे. राष्ट्राच्या विकसनशील प्रक्रियेतील श्रीधरन यांचे योगदान सदैव प्रेरणादायी आहे, असे विचार टी. जयाकृष्ण शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केले.

जयश्रीकृष्ण परिसर प्रेमी समिती गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम देशभर राबविण्यात येत आहेत, त्यांच्या या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळत असून नवी पिढी घडवली जात आहे, श्रीधरन यांचा सन्मानदेखील त्यांनी अशा सार्वजनिक कार्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता असल्याचे मत माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केले.

Share.