दिनांक –१६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथील श्रीसदगुरु नारायण महाराज यांचं नुकतच निधन झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे भेट देऊन श्री सद्गुरु नारायण महाराजांच्या प्रतिमेस आदरांजली वाहिली तसेच अनुयायांची भेट घेऊन सांत्वन केले.
“सद्गुरु नारायण महाराजांचे निधन ही महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, पुरोगामी, सुधारणावादी चळवळीची मोठी हानी आहे. अध्यात्माच्या माध्यमातून लोकजागृती, लोकजागृतीतून लोकचळवळ, लोकचळवळीतून सामाजिक सुधारणा, पुरोगामी विचार गावोगावी पोहचवले. श्रीसदगुरु नारायण महाराजांचे विचार आणि सेवाकार्य सर्वांनी मिळून पुढे नेणे. सामुदायिक शेती, सामुदायिक विवाह, सामुदायिक श्रमदान, व्यसनमुक्तीचे त्यांचे कार्य अखंडीतपणे कायम ठेवणे हीच श्रीसदगुरु नारायण महाराजांना खरी आदरांजली ठरेल,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन आदरांजली वाहिली.