दिनांक :- १७-०८-२०२६, गर्जा महाराष्ट्र न्युज,भिवंडी :- कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि अंबरनाथ परिसरातील भयानक जल-वायू प्रदूषण, अवैध जीन्स फॅक्टरी आणि बेकायदेशीर डायिंग कारखान्यांविरोधात ‘ग्रीन इंडिया पोल्युशन CONTROL फाउंडेशन’ने उठवलेल्या आवाजाची राज्याच्या पर्यावरण विभागाने गांभीर्याने दखल घेतली आहे. फाउंडेशनचे संस्थापक चेअरमन श्री अनिल महाजन यांच्या अर्जावर पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे व पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज यांनी एमपीसीबी (MPCB) सायन बोर्डाच्या सदस्य सचिवांना तात्काळ कठोर कारवाईचे व प्रशासकीय सुधारणांचे निर्देश दिले आहेत.
भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी आणि भिवंडीतील अवैध डायिंगचा प्रश्न
भिवंडी शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या बेकायदेशीर डायिंग व जीन्स फॅक्टरींचे अतिविषारी रासायनिक पाणी प्रक्रिया न करता थेट खाडी आणि नद्यांमध्ये सोडले जात आहे. यामुळे मत्स्यव्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भिवंडी पालिका प्रशासन प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कारवाई करत असताना MPCB चे स्थानिक अधिकारी मात्र कुंभकर्णाच्या झोपेत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध जीन्स फॅक्टरी थाटण्यासाठी MPCB मधील कुठल्या अधिकाऱ्यांचे आशीर्वाद लाभले आहेत, याची सखोल चौकशी करण्याची मागणी फाउंडेशनने केली असून यावर कठोर कारवाईचे संकेत मिळाले आहेत.
कल्याण MPCB कार्यालयात अतिरिक्त स्टाफ व वाहने पुरवण्याची मागणी मान्य
प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यात कल्याण प्रदूषण नियंत्रण कार्यालयाला (MPCB Kalyan) येणाऱ्या अडचणींचा अभ्यास केला असता, तेथे कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आणि वाहनांचा अभाव असल्याचे समोर आले होते. ग्रीन इंडिया पोल्युशन कंट्रोल फाउंडेशनने मांडलेली ही मागणी पर्यावरण मंत्रालयाने मान्य केली आहे. एमपीसीबीच्या सदस्य सचिवांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत की, कल्याण कार्यालयातील अपुरा स्टाफ लक्षात घेता तातडीने अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती करावी आणि वाहने उपलब्ध करून द्यावीत, जेणेकरून प्रदूषणावर चोख आणि नियमित देखरेख ठेवता येईल.
बातमीचे मुख्य मुद्दे:
* अवैध कारखान्यांवर कारवाई: सर्व अवैध जीन्स व डायिंग कारखान्यांची तात्काळ कसून चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांना निलंबन व ‘क्लोजर नोटीस’ द्यावी.
* भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी: बेकायदेशीर कारखानदारांना अभय देणाऱ्या MPCB अधिकाऱ्यांची चटकट चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी.
* कल्याण कार्यालयात स्टाफ भरती: कल्याण MPCB कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा व वाहनांचा तुटवडा भरून काढण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे आदेश जारी.
* शासनाचे अधिकृत पत्र: प्रधान सचिव जयश्री भोज यांच्या स्वाक्षरीचे पत्र ‘ग्रीन इंडिया पोल्युशन कंट्रोल फाउंडेशन’ला प्राप्त झाले असून MPCB सायन बोर्डाला तातडीने अंमलबजावणीचे निर्देश.
शासन स्तरावरून झालेल्या या धडक निर्णयामुळे बेकायदेशीर कारखानदारांसह त्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.

