दिनांक :१७/११/२०२६,गर्जा महाराष्ट्र न्युज,विशेष प्रतिनिधी पाचोरा :- पाचोरा तालुक्यात व परिसरात सध्या अनाधिकृत वीटभट्ट्यांचा सुळसुळाट झाला असून, अनेक वीटभट्टी चालक शासनाचा कोणताही महसूल (रॉयल्टी) न भरता आणि स्वतःच्या मालकीची जागा नसतानाही बिनदिक्कतपणे बेकायदेशीर व्यवसाय करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकाराची ‘गर्जा महाराष्ट्र न्यूज’चे मुख्य संपादक तथा ‘ग्रीन इंडिया पोल्युशन कंट्रोल फाउंडेशन’चे अध्यक्ष श्री.अनिलभाऊ महाजन यांनी अत्यंत तीव्र दखल घेतली असून, दोषींवर तातडीने कडक कायदेशीर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.

पाचोरा तालुक्यातील व शहरातील अनेक भागांत सुरू असलेल्या या वीटभट्ट्यांमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असून, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या विशेष पथकाने अथवा स्थानिक तहसीलदार साहेबांनी स्वतः घटनास्थळी जाऊन सर्व वीटभट्ट्यांची कसून आणि तात्काळ तपासणी करावी, अशी मागणी केली जात आहे.

तपासणीदरम्यान खालील मुख्य मुद्द्यांची चौकशी व्हावी:
१. मातीची रॉयल्टी व परवानग्या: वीटभट्टीसाठी वापरल्या जाणाऱ्या मातीची योग्य रॉयल्टी भरली आहे का? माती उत्खननाची अधिकृत परवानगी आहे का? याची तपासणी व्हावी.
२. जागेची पाहणी: वीटभट्ट्या उभारलेली जागा स्वतःच्या मालकीची आहे की शासकीय व खाजगी जमिनींवर अतिक्रमणे करून हे उद्योग थाटले आहेत, याची शहानिशा केली जावी.
३. कोळशाचा बेकायदेशीर वापर: भट्ट्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कोळशाबाबत कसून चौकशी व्हावी. तो कोळसा वापरण्याची रीतसर परवानगी आहे का, तसेच बंदी असलेला अथवा निकृष्ट दर्जाचा ज्वलनशील पदार्थ वापरून प्रदूषण पसरवले जात आहे का, याची संपूर्ण माहिती घेतली जावी.

“प्रदूषण पसरवणाऱ्यांची गय केली जाणार नाही!” — अनिलभाऊ महाजन.

या विषयावर बोलताना ग्रीन इंडिया पोल्युशन कंट्रोल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.अनिलभाऊ महाजन यांनी स्पष्ट व कडक इशारा दिला आहे की, “पर्यावरणाचा समतोल बिघडवून आणि नियम धाब्यावर बसवून चालणाऱ्या या अनाधिकृत भट्ट्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जे वीटभट्टी चालक दोषी आढळतील त्यांच्यावर महसूल विभागाकडून कडक कायदेशीर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत. तसेच जे चालक हवेचे व पर्यावरणाचे प्रदूषण करत आहेत, त्यांच्यावर ‘पोल्युशन ॲक्ट’ (प्रदूषण नियंत्रण कायदा) अंतर्गत तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी.”

प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास अथवा तपासणीत टाळाटाळ केल्यास, याविरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा स्पष्ट इशाराही श्री. अनिलभाऊ महाजन यांनी दिला आहे. आता महसूल विभाग आणि जिल्हाधिकारी प्रशासन या बेकायदेशीर वीटभट्ट्यांवर काय पावले उचलते, याकडे संपूर्ण पाचोरा तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Share.