दिनांक :१३/१०/२०२६, गर्जा महाराष्ट्र न्युज,पाचोरा (प्रतिनिधी): पाचोरा शहराच्या मध्यवर्ती व अत्यंत गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सध्या अनधिकृत बॅनरचा मोठा विळखा पडला आहे. सत्ताधारी असोत की विरोधी पक्ष, खासदार-आमदारांचे कार्यकर्ते असोत की स्थानिक पुढारी—उठसूट कोणीही कुठेही बेकायदेशीरपणे जाहिरातबाजी करत बॅनर लावत आहेत. या लोकांना जणू कायद्याचा कसलाच धाक उरलेला नाही. कोणत्याही बॅनरसाठी नगरपालिकेची अधिकृत परवानगी घेतलेली नाही. या प्रकारामुळे शहराच्या सौंदर्याचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून, वाहनधारकांचे लक्ष विचलित होऊन अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

येणाऱ्या काळात दसरा, दिवाळी असे मोठे सण-उत्सव येत असून शहरात नागरिकांची व खरेदीदारांची प्रचंड गर्दी होणार आहे. अशा वेळी शहर सुटसुटीत, स्वच्छ आणि सुरक्षित असणे गरजेचे आहे. बाहेरून पाचोरा शहरात येणाऱ्या लोकांचा शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन खराब होऊ नये आणि शहराच्या विकासात बाधा येऊ नये, यासाठी प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘गर्जा महाराष्ट्र न्यूज’ चॅनलचे मुख्य संपादक श्री. अनिल भाऊ महाजन यांनी नगरपालिका व पोलीस प्रशासनाला लेखी पत्राद्वारे तीव्र इशारा दिला आहे.
प्रशासनाला स्पष्ट इशारा व प्रमुख मागण्या:
* ट्रॅक्टर लावून बॅनर जप्त करा: पाचोरा पालिकेने तत्काळ ट्रॅक्टर व कर्मचारी पाठवून शिवाजी चौकातील सर्व अनधिकृत बॅनर हटवून ते जप्त करावेत.
* परवानगीशिवाय बॅनरवर बंदी: नगरपालिकेची पूर्वपरवानगी असल्याशिवाय शिवाजी चौकात कोणताही बॅनर लावू दिला जाऊ नये. अधिकृत बॅनर असतील तर ते नगरपालिकेने निश्चित केलेल्या योग्य जागेवरच लावण्यात यावेत.
* दोषींवर गुन्हे दाखल करा: पक्ष किंवा नेता कोणताही असो, कायदे सर्वांसाठी समान आहेत. परवानगीशिवाय बेकायदेशीर बॅनर लावणारे व ज्यांचे बॅनर आहेत, त्या सर्वांवर पाचोरा पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत.
* वरिष्ठ स्तरावर कारवाईचा इशारा: नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि पाचोरा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी यावर त्वरित कारवाई न केल्यास, थेट जिल्हाधिकारी कार्यालय व मंत्रालय स्तरावर तक्रार करून कायदेशीर कारवाई केली जाईल.

“पाचोरा हे स्वच्छ, सुंदर आणि सुटसुटीत शहर राहिले पाहिजे. स्वतःचे मोठेपण मिरवण्यासाठी सत्ताधारी किंवा विरोधकांच्या कार्यकर्त्यांनी शहराचे सौंदर्य बिघडवणे आणि अपघातांना आमंत्रण देणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. सण-उत्सवाच्या काळात गर्दी लक्षात घेता प्रशासनाने तत्काळ सर्व अनधिकृत बॅनर काढावेत.”

Share.