दिनांक – ०६/०१/२०२६,सातारा प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सर्वदे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या प्रकरणातील मुख्य आरोपींना सातारा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत. सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार शालन शिंदे आणि बंडखोर उमेदवार रेखा सर्वदे यांच्यात उमेदवारीवरून वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी आणि मध्यस्थी करण्यासाठी मनसेचे बाळासाहेब सर्वदे गेले होते. मात्र, शुक्रवारी (२ जानेवारी) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी हा वाद विकोपाला गेला.
प्राप्त माहितीनुसार, आरोपींनी बाळासाहेब सर्वदे यांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सर्वदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर सोलापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि संतप्त जमावाने भाजप कार्यालयाची तोडफोडही केली.

आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग आणि साताऱ्यात अटक: हत्येनंतर मुख्य आरोपी फरार झाले होते. सोलापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) माहिती मिळाली की, संशयित आरोपी साताऱ्याच्या दिशेने पळाले आहेत. यानुसार सातारा पोलिसांना सतर्क करण्यात आले.
आरोपींनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आपला मार्ग बदलला. ते कराडच्या दिशेने जात असताना अचानक गाडी फिरवून पुन्हा साताऱ्याकडे निघाले. मात्र, तळबीड पोलिसांनी महामार्गावरील तासवडे टोलनाक्यावर (सातारा) कडक नाकाबंदी केली होती. या नाकाबंदीत आरोपींची गाडी अडकली आणि पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये खालील संशयितांचा समावेश आहे: (०१)शंकर बाबू शिंदे (०२)सुनील शंकर शिंदे (०३)आलोक तानाजी शिंदे (सर्व रा. रविवार पेठ, सोलापूर) (०४)महेश शिवाजी भोसले (रा. माळेवाडी, ता. माळशिरस)

Share.