दिनांक – ०२/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुंबईच्या लालबाग परिसरात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. लालबाग परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली. या अपघातामध्ये एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या इतर ८ जणांवर केईएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर लालबाग परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
रविवारी सव्वा आठच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. बेस्ट बस क्रमांक ६६ नंबरची बस लालबागवरून जात असताना हा अपघात झाला. ही बस भाटियाबाग येथून राणी लक्ष्मीबाई चौकाकडे निघाली होती. यावेळी ही बस लालबागमधील गणेश टॉकीज परिसरात आली असता एका मद्यधुंद प्रवाशाने काही क्षुल्लक कारणांवरून चालकासोबत वाद घातला.
हा प्रवासी थेट चालकाच्या केबिनजवळ गेला. प्रवाशाचे बस धावत असताना चालकाला स्टेअरिंगवरून ओढण्याचा प्रयत्न केला. त्याने डाव्या बाजूने बसचे स्टेअरिंग हातात घेत ते फिरवले. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि या बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना धडक देत ९ जणांना चिरडले.
या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना त्यांनी तात्काळ केईएम रुग्णालयामध्ये दाखल केले. या भीषण अपघातामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले. जखमी पादचाऱ्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या दोन्ही महिलांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर केईएमच्या आयसीयू वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. श्रेया मणियार आणि नुपुरा मणियार असं त्यांची नावं आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यधुंद प्रवाशाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे