दिनांक – ०३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या ९३ पैकी ४५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर शनिवारी २६ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून लागवडीखालील दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

तथापि, नांदेड तालुक्यात दुपारी ४ वाजताच्या दरम्यान पासदगाव पुलावरून पाणी जात होते. प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी वारंवार सांगून सुद्धा एका व्यक्तीने प्रशासनाचे काहीच न ऐकता पुल ओलांडण्याच्या प्रयत्नात तो वाहून गेला आहे. त्याचा शोध सुरु आहे.

उंचाडा येथे गावाजवळ कयाधु नदीच्या परीसरात जवळपास २५ लोक अडकले होते. जिल्‍हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड कडून राज्य आपत्ती प्रतिसाद दल ची तुकडी त्या ठिकाणी पाठवून शोध व बचाव कार्य करुन २५ जणांना पुरातुन सुखरुप बाहेर काढले.

२५ जनावरे मृत्युमुखी पडली असून काही प्रमाणात घरांचेही नुकसान झाले आहे. उद्या पाऊस थांबल्यास नुकसानीचे पंचनामे सुरू होतील असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

गोदावरी नदीची नांदेड शहरातील धोक्याची पातळी ३५४ मीटर आहे. संध्याकाळी ८ वाजता ही पातळी ३५२.७५ होती. या परिसरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. बचाव पथक तैनात असून नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अपर मानार लिंबोटी धरणाची पंधरा पैकी ९ दरवाजे उघडलेले आहेत.लोअर मानार बारुळ धरणाला अॅटोमॅटीक गेट आहेत. त्यामुळे येणारा विसर्ग जशाला तसा पुढे जातो आहे. बळेगाव हाय लेव्‍हल बॅरेजचे एकूण १४ दरवाजे उघडलेले आहेत. आमदुरा हाय लेव्‍हल बॅरेजचे सर्व १६ दरवाजे उघडलेले आहेत. बाभळी हाय लेव्‍हल बॅरेजचे सर्व १४ दरवाजे उघडलेले आहेत. दिग्रस धरणाचे १४ दरवाजे उघडलेले आहे. जायकवाडी पासून बाभळीपर्यत सर्व गोदावरी वरील बंधाऱ्यांचे दार उघडे आहेत.

ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दुपारी जिल्हाधिकारी व अन्य प्रमुख अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला शक्य तेवढ्या लवकर नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याबाबतचे निर्देश त्यांनी दिले.

Share.