दिनांक – ०५/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनीही गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले.
तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा पारंपारिक पद्धतीने शाल, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रपती महोदयांच्या कन्या इतीश्री याही उपस्थित होत्या. त्यांचाही यावेळी गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, सचखंड गुरुद्वाराचे प्रशासक डॉ. विजय सतबिरसिंगजी, सल्लागार जसवंतसिंग बॉबी, अधिक्षक राज देविंदरसिंगजी, पुजारी बाबा ज्योतिदरसिंगजी जत्थेदार, संत बाबा बलविंदरसिंगजी आदी उपस्थित होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुद्वारा येथील दर्शनानंतर तेथे असलेल्या लंगरला भेट देवून पाहणी केली व समाधान व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेचे लाभार्थी कटलरी व किचन्स, खेळणी व्यवसायिक केतन लक्ष्मण कळसकर व फळे आणि ज्यूस व्यावसायिक समशेरसिंग लालसिंग राठोड यांच्या स्टॉलला भेट देवून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.