दिनांक –०५/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- नाशिक जिल्ह्यातील नामपूर येथील हिरा हॉस्पिटलचे संचालक व भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सी. एन. पाटील, जिप सदस्या सुनीता पाटील यांच्या डॉक्टर मुलाचा आणि डॉक्टर जावयाचा एकाचा दिवशी मृत्यू झाला आहे. या दोघांवर एकाच दिवशी अंत्यसंस्कार करण्याची वेळ या दाम्पत्यावर आली आहे. या घटनेने नाशिकवर शोककळा पसरली आहे.
डॉ. सी. एन. पाटील यांचा मुलगा डॉ. आदित्य चिंतामण पाटील याने लातूर वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस पदवी घेतली होती. तो वडिलांच्या व्यवसायात मदत करत होता. सुमारे 20 दिवसांपूर्वी त्याला काविळची लागण झाली होती. आदित्यला उपचारासाठी आधी मालेगावला त्यानंतर नाशिकला नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला
तर दुसरीकडे डॉ. सी. एन. पाटील यांचे जावई निवृत्त वन अधिकारी वामनराव खैरनार यांचे चिरंजीव डॉ. विजय वामनराव खैरनार यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांनी त्यांचा प्राण गमावला. कुपखेडा येथील मूळ रहिवासी असलेल्या पाटील आणि खैरनार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोरोना काळात डॉ. सी. एन. पाटील यांनी नागरिकांची अहोरात्र सेवा केली. गोरगरीब रुग्णांच्या हक्काचा दवाखाना म्हणून डॉ. पाटील यांची नाशिकमध्ये ओळख आहे. परंतु डॉक्टर मुलाचा काविळने तर जावयाचा डेंग्यूने एकाच दिवशी मृत्यू झाल्याने पाटील आणि खैरनार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.