दिनांक – १३/०४/२०२६ मुंबई ,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- छत्रपती शिवाजी महाराजl टर्मिनस (CSMT) आणि ऐतिहासिक बाजार गेट स्ट्रीट रोड परिसरात सध्या अनधिकृत हॉकर्स, दुकानदार आणि बेशिस्त वाहनांमुळे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून चालणे अत्यंत कठीण झाले आहे. संपूर्ण फूटपाथ हॉकर्स आणि स्थानिक दुकानदारांनी गिळंकृत केले असून, या गंभीर समस्येकडे मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक पोलीस प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. या वाढत्या त्रासामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

फूटपाथवर चहाच्या टपऱ्या आणि टवाळखोरांचा सुळसुळाट
बाजार गेट परिसरातील ठिकठिकाणी बेकायदेशीर चहाचे स्टॉल्स आणि पान टपऱ्या थाटण्यात आल्या आहेत. या टपऱ्यांच्या बाहेर दिवसभर शेकडो लोक धूम्रपान करत आणि चहा पीत गर्दी करून उभे असतात. त्यामुळे CSMT स्थानकाकडे ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांना, विशेषतः महिला आणि लहान मुलांना, या गर्दीतून वाट काढताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
बेशिस्त पार्किंग आणि वाहतूक पोलिसांची ‘ठराविक’ कारवाई

या परिसरात मोठ्या प्रमाणावर पेपर मार्ट आणि कुरिअरची दुकाने आहेत. या दुकानांचे मालक आणि ग्राहक त्यांचे ट्रक्स, टेम्पो आणि थ्री-व्हीलर गाड्या थेट रस्त्यावर आणि फूटपाथवर पार्क करतात. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई केवळ तात्पुरती ठरते; अधिकारी गेले की पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते.आश्चर्याची गोष्ट म्हणजे,ज्या ठिकाणी खरोखरच मोठी वाहतूक कोंडी (ट्रॅफिक) होते, तिथे वाहतूक पोलीस कारवाई करताना दिसत नाहीत. केवळ काही ठराविक ठिकाणीच पोलिसांची वसुली किंवा दंडात्मक कारवाई सुरू असते, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

सायंकाळनंतर नशेड्यांचे साम्राज्य;पैशांची मागणी करणाऱ्या महिलांची टोळी सक्रिय
हा परिसर अतिशय संवेदनशील मानला जातो. येथे ‘पोलीस उपायुक्त झोन १’ चे कार्यालय आहे आणि हा भाग एम.आर.ए. पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत येतो. असे असूनही, सायंकाळी ७ वाजेनंतर या परिसरात दारू, गर्दा आणि इतर अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या नशेड्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढतो.तसेच, बाजार गेट परिसरात पैसे मागणाऱ्या महिलांची एक मोठी टोळी सक्रिय झाली आहे. गळ्यात बॅग अडकवून आणि लहान मुलांना सोबत घेऊन या महिला येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना अडवून पैशांची मागणी करतात, ज्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तर थेट पालिका आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार;पत्रकार परिषदेचा इशारा
बाजार गेट परिसरातील ही अस्वच्छता, ट्रॅफिक समस्या, अनधिकृत पार्किंग,उघड्यावरील धूम्रपान आणि नशेड्यांचा सुळसुळाट थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर सामाजिक नेते व वरिष्ठ पत्रकार, तसेच ‘गर्जा महाराष्ट्र न्यूज समूहा’चे मुख्य संपादक श्री. अनिलभाऊ महाजन यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.श्री.महाजन हे लवकरच मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे मॅडम, मुंबई पोलीस आयुक्त ,श्री.देवेन भारती,तसेच राज्याचे नगरविकास मंत्री, गृहमंत्री आणि प्रधान सचिवांची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान संपूर्ण बाजार गेट परिसराच्या दुरावस्थेचे आणि बेकायदेशीर कृत्यांचे व्हिडिओ शूटिंग वरिष्ठांसमोर सादर केले जाईल. तसेच, या गंभीर मुद्द्यावर पत्रकार परिषद घेऊन सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामध्ये ही वस्तुस्थिती चव्हाट्यावर आणली जाईल, असा थेट इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

आता तरी पालिका प्रशासन आणि एम.आर.ए. पोलीस झोपेतून जागे होऊन या संवेदनशील परिसराला अतिक्रमणाच्या आणि नशेड्यांच्या विळख्यातून मुक्त करणार का? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजl टर्मिनस (CSMT) बाजारगेट परिसरातील फूड स्टॉल्सवर अस्वच्छतेचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष!बाजार गेट स्ट्रीट परिसर आणि फूटपाथवर सुरू असलेल्या लहान-मोठ्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर सध्या मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण झाली आहे. चहा, वडापाव, चायनीज, पिझ्झा, बर्गर, सँडविच यांसारखे उघड्यावरील खाद्यपदार्थ नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असून, अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि स्थानिक प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.

खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा आणि अन्न दर्जाचा प्रश्न गंभीर

बाजारपेठ परिसरात दिवसेंदिवस फूड स्टॉल्सची संख्या वाढत आहे. मात्र, हे पदार्थ नक्की कुठल्या ठिकाणी बनवले जातात? तिथे स्वच्छता राखली जाते का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी आणि भांडी धुण्यासाठी कुठल्या दर्जाचे पाणी वापरले जाते? याची कोणतीही तपासणी केली जात नाही. अनेक ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचे तेल, सॉस आणि सडलेल्या भाज्यांचा वापर केला जात असल्याची दाट शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

कामगारांची आरोग्य तपासणी नाहीच!
नियमांनुसार खाद्यपदार्थ विक्रेत्यांची आणि तिथे काम करणाऱ्या कामगारांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी (Medical Fitness) होणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमांना केराची टोपली दाखवली जात आहे. उघड्यावर पसरलेला कचरा, सांडपाणी आणि त्या शेजारीच बनवले जाणारे खाद्यपदार्थ यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.

विषबाधेचा मोठा धोका,कसून तपासणीची मागणी
सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फूड स्टॉल्सवरील दूषित अन्न आणि पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर विषबाधा (Food Poisoning) झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशीच एखादी मोठी दुर्घटना छत्रपती शिवाजी महाराजl टर्मिनस (CSMT) बाजार गेट स्ट्रीट येथील परिसरात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आणि आरोग्य विभागाने या सर्व स्टॉल्सची, तिथे अन्न बनवण्याच्या पद्धतीची आणि कामगारांची कसून तपासणी करावी, तसेच दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

सदर संवेदनशील विषयावर त्या-त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्यात दिरंगाई केल्यास. प्रत्येक अधिकाऱ्याच्या क्षेत्रात येणाऱ्या विषयाची जबाबदारी निश्चित करून पुढील कार्यवाहीसाठी मागणी वरिष्ठांकडे करण्यात येईल.

Share.