दिनांक –१८/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्यातील एक हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन दि.20 सप्टेंबर 2024 रोजी मा. प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते वर्चुअल ऑनलाईन पद्धतीने करण्याचे निश्चित झाले आहे. रायगड जिल्ह्यातील 16 महाविद्यालयामधील केंद्राचा समावेश आहे. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रामधून युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीकोनातून नामांकित महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण,2020 मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व देण्यात आलेले आहे. त्या धोरणाच्या अमंलबजावणीला सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी तसेच युवक युवतींना कौशल्य विकासाची संधी महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्र स्थापन करून 15 ते 45 वयोगटातील युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहेत.