दिनांक – २९/०८/२०२६ ,गर्जा महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : नेपाळची राजधानी काठमांडू येथे ‘नेपाळ कुशवाह कल्याण समाज’च्या वतीने आयोजित लव-कुश जयंती सोहळ्यात माळी-कुशवाह समाजाच्या आंतरराष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील माळी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे माळी समाज महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन यांचा नेपाळमधील कुशवाह-माळी समाजाच्या वतीने गौरव करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

मात्र, नेपाळमधील पूरस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन अनिल महाजन यांनी स्वतःचा सत्कार स्वीकारण्यास नकार देत सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला.

या कार्यक्रमाला नेपाळ कुशवाह कल्याण समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रमुख राष्ट्रीय पदाधिकारी तसेच महाराष्ट्रातून गेलेले माळी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन

आपल्या भाषणात अनिल महाजन यांनी नेपाळमधील पूरग्रस्तांच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे अनेक समाजबांधवांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अशा दुःखाच्या परिस्थितीत उत्सव किंवा सत्कार स्वीकारणे योग्य नाही. नेपाळ सरकारने पूरग्रस्तांना तातडीने आणि आवश्यक ती मदत उपलब्ध करून द्यावी.”

तसेच, या नैसर्गिक आपत्तीच्या काळात नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय पर्यटकांना नेपाळमधील कुशवाह समाजाने सर्वतोपरी मदत व आधार द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

विविध नावांमधून एकाच समाजाची ओळख

माळी-कुशवाह समाजाच्या आंतरराष्ट्रीय संघटनाबाबत मार्गदर्शन करताना महाजन यांनी समाजाच्या विविधतेतील एकतेवर भर दिला.

ते म्हणाले, “भारत आणि भारताबाहेर आपला समाज विविध नावांनी ओळखला जातो. नेपाळ, उत्तर प्रदेश व बिहारमध्ये कुशवाह, राजस्थानमध्ये सैनी व गेहलोत, उत्तर प्रदेशातील काही भागांत मौर्य, तर महाराष्ट्रात माळी आणि महाजन अशा विविध नावांनी समाजाची ओळख आहे. नावे वेगवेगळी असली तरी आपली सामाजिक आणि सांस्कृतिक मुळे एकच आहेत.”

जगभरातील माळी-कुशवाह समाजाला एका व्यासपीठावर आणून आंतरराष्ट्रीय पातळीवर मजबूत संघटन उभारण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महाराष्ट्रातून मदतीचा हात

नेपाळ आणि महाराष्ट्रातील माळी-कुशवाह समाजातील सामाजिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी तसेच गरजेच्या काळात परस्परांना मदतीचा हात देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

पूरग्रस्तांच्या दुःखाला प्राधान्य देत स्वतःचा सत्कार नाकारण्याचा निर्णय आणि समाजाच्या आंतरराष्ट्रीय एकतेचा संदेश यामुळे काठमांडू येथील हा सोहळा अनिल महाजन यांच्या सामाजिक भान आणि संवेदनशीलतेमुळे विशेष चर्चेचा विषय ठरला.

.

Share.