दिनांक –१०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भारतीय जनता पक्ष युती सरकारच्या काळात सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार व त्यांच्या नातेवाईकांना कायद्याचा धाकच नाही. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सत्ताधारी पक्षाच्या दावणीला बांधली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळेच्या ऑडी कारने नागपुरात मद्यधुंद अवस्थेत अनेक गाड्यांना ठोकरले. पण बावनकुळेंच्या मुलावर अद्याप कारवाई केली नाही. पोलिसांवर कोणाचा दबाव आहे ? असा प्रश्न प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
नागपुरात ऑडी कारने तीन-चार लोकांना ठोकरले ती कार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांची आहे, अपघातानंतर कारच्या नंबर प्लेट्स काढून कारमध्ये ठेवण्यात आल्याचे दिसले म्हणजे पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला आहे. बजाजनगरमध्ये या कारच्या अपघातात एका व्यक्तीच्या खांद्याला मार लागला आहे पण तो काही बोलण्यास तयार नाही. आणखी दोघेजण जखमी झाले आहेत तेही काही बोलत नाहीत. रात्री १२.३६ वाजता अपघात झाला मग १२.३० ते १ च्या दरम्यान संकेत बावनकुळेचे लोकेशन काय होते? संकेत बावनकुळेला अटक करून त्याच्यावर कारवाई न करता पोलीस प्रशासन त्याला पाठीशी घालत असून दबावाखाली हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सत्ताधारी दनदांडग्या नेत्यांच्या मुलांसाठी जनतेचा जीव स्वस्त झाला आहे का? ‘हिट अँड रन’ प्रकरणात भाजपा व सत्ताधारी पक्षातील नेत्यांची मुले वा संबंधित लोकच जास्त दिसतात. राज्यातील जनतेच्या जीवाची किंमत महायुती सरकारला नाही. केवळ स्वतःच्या नेत्यांना आणि धन दांडग्याना वाचवणारेच हे सरकार आहे. मात्र याची किंमत येणाऱ्या काळात या सरकारला चुकवावी लागेल आता जनताच या सरकारला उत्तर देईल, असेही अतुल लोंढे म्हणाले.