दिनांक – ०६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- विद्यार्थ्यांना आयुष्याची दिशा दाखविण्यात शिक्षकांचे समर्पण, मार्गदर्शन आणि योगदान महत्त्वाचे असून त्यांच्यामध्ये जग बदलण्याची ताकद असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. महाराष्ट्र विविध क्षेत्रात देशात क्रमांक एकवर आहे. शिक्षण क्षेत्रातही अग्रेसर राहण्यासाठी आपण निर्धार करुया, असे आवाहन त्यांनी केले.

सन २०२३-२४ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांना आज मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. एनसीपीए येथील टाटा सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय ए कुंदन, शालेय शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, शिक्षक आमदार किरण सरनाईक, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी संभाजी थोरात आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. मंत्री श्री.केसरकर यांच्या कार्यकाळातील निर्णयांचे संकलन असलेल्या कार्यअहवालाचे तसेच बालभारतीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज स्मृती ग्रंथाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री म्हणाले, शिक्षकांच्या योगदानाशिवाय देश प्रगतीपथावर जाऊ शकत नाही, यामुळेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रात राज्याला अग्रेसर राखण्यासाठी नवनवीन कल्पनांना शासनाने नेहमीच पाठबळ दिले आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच कौशल्याची जोडही आवश्यक असल्याने नवीन शिक्षण पद्धती अवलंबण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आयुष्यात मोठी उंची गाठणे शक्य होईल आणि या कामी योग्य वेळी योग्य दिशा दाखवण्याचे काम शिक्षक करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमाच्या माध्यमातून तीन जागतिक विक्रम प्रस्थापित झाले आहेत. आदर्श शाळा विद्यार्थ्यांना जगण्याचा मंत्र शिकवित असल्याने आदर्श शाळा घडविण्यामध्ये शिक्षकांची भूमिका मोलाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रात देशात पहिल्या क्रमांकाकडे झेप घेण्यामध्ये शासकीय शाळांचा मोठा वाटा असल्याचे सांगून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न आस्थेवाईकपणे सोडविण्यात येतील असेही ते म्हणाले. आपल्या किसननगर येथील शाळेच्या आठवणी जागवून आपल्या प्रगतीमध्ये शिक्षक रघुनाथ परब यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. इमारतींपेक्षा शिक्षकांवरून शाळेचे महत्त्व ठरते असे सांगून खडू आणि छडीच्या जोरावर आयुष्याची शिडी चढण्यास शिकविणाऱ्या शिक्षकांचे त्यांनी अभिनंदन केले.

ॲड.नार्वेकर म्हणाले, ‘वाचाल तर वाचाल’ असे नेहमी म्हटले जाते. परंतु जो वाचायला शिकवतो तो समाज घडवतो, यामुळे चांगला समाज घडविण्यामध्ये शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे. शासनाने शिक्षण क्षेत्राला प्राधान्य दिले असून देशाला जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी अग्रेसर होण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

Share.