दिनांक –२४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कार्यक्रम-२०३० संदर्भात केंद्र शासनाच्या प्रयत्नांसाठी महाराष्ट्राची बांधिलकी आणि योगदान महत्वाचे आहे. उद्योग, तंत्रज्ञान आणि कृषी या क्षेत्रांच्या विकासासाठीचा एकात्मिक दृष्टीकोन स्विकारण्यात आला आहे. शाश्वत विकास उद्दिष्टपूर्ती बरोबरच भारताला समृद्ध आणि विकसित राष्ट्र बनविण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान सर्वाधिक महत्वाचे ठरत आहे, असे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळ, भारत विभागाच्या (CPA India Region) १० व्या परिषदेत ते बोलत होते.

नवी दिल्ली येथे दिनांक २३ व २४ सप्टेंबर, २०२४ रोजी लोकसभा अध्यक्ष आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळ, भारत विभागाचे प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद “शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासासंदर्भात विधानमंडळांची भूमिका” या विषयावर आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेस महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित आहेत.लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्यसभेचे उप सभापती श्री. हरिवंश यांच्या प्रमुख उपस्थितीत या दोन दिवसीय परिषदेस प्रारंभ झाला. परिषदेतील चर्चासत्रात ॲड. राहुल नार्वेकर यांनी आपले विचार मांडले.

पर्यावरण रक्षणासाठी सौर आणि पवन ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन, समृध्दी महामार्गालगत बांबू लागवड यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक नागरीकरणाचा वेग असलेले राज्य असल्याने सार्वजनिक वाहतुकीचे विस्तारते जाळे, इलेक्ट्रिक वाहने, सुनियोजित गृहनिर्माण प्रकल्प या मुद्यांकडे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आपल्या भाषणात उपस्थितांचे लक्ष वेधले. विधानमंडळ म्हणून विचार करता केवळ आर्थिक विकास हेच एकमेव मानक स्वीकारून चालणार नाही तर सर्वसमावेशक विकास स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना पायाभूत सोयीसुविधांचा वापर शहरांबरोबरच ग्रामीण विभागात वाढत्या रोजगार संधी निर्माण करणे या बाबींकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे ॲड नार्वेकर यावेळी म्हणाले.

Share.