दिनांक –२५/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ‘मराठी विश्वकोशाचे अद्ययावतीकरण व अन्य उपक्रमांना अधिक पाठबळ देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, पदभरती मुळे या उपक्रमांना अधिक बळ मिळेल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकडील नवनियुक्त संपादकीय सहायक व शिपाई या गट क संवर्गातील उमेदवारांना मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते नियुक्तपत्रे प्रदान करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ.शामकांत देवरे, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ.मिनाक्षी पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुनीलकुमार लवटे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे प्रभारी सहायक सचिव ललित कुडमथे, वरिष्ठ लिपिक शितल शिंदे उपस्थित होते.
मराठी विश्वकोशाच्या मुंबई व वाई येथील कार्यालयातील अनेक पदे सन २०१५ पासून रिक्त होती. यासाठी सचिव डॉ. शामकांत देवरे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करून पदभरती प्रक्रिया राबविली. ही पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करून दि. १६ मार्च रोजी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत गुणवत्ताप्राप्त उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना आज नियुक्तीपत्रे देण्यात आली. या नवीन निवडीमुळे विश्वकोश कामाला अधिक कुशल मनुष्यबळ मिळाल्याने संकेतस्थळावर नवीन नोंदी घेणे, कुमार विश्वकोश, जुन्या खंडांचे अद्ययावतीकरण या कामकाजाला मोठी गती येणार आहे.