दिनांक – ०६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मानखुर्द येथील वॉर्डच्या १४३ माजी नगरसेविका ऋजुता तारी यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तारी यांच्या पक्ष प्रवेशाने उबाठा गटाला खिंडार पडले असून आतापर्यंत त्यांचे ५५ नगरसेवक मूळ शिवसेनेत परतले आहेत. मलबार हिल येथील नंदनवन बंगला येथील कार्यक्रमात पुणे कोंढवा परिसरातील युवा कार्यकर्ते आणि महाराष्ट्र सरपंच सेवा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेना पक्षात प्रवेश केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सक्षम नेतृत्व आणि कल्याणकारी योजनांमुळे जनमाणसांत पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने शिवसेनेत राज्यभरातून हजारो कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. मानखुर्दमधील माजी नगरसेविका ऋजुता तारी यांच्यासह उदयनाथ तारी, अशोक गव्हाणे आणि शेकडो कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत केले. त्याचबरोबर पुणे कोंढवा परिसरातील शारदा गायकवाड, अमोल गायकवाड, अरविंद शिंदे युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मुंबई महापालिकेतील उबाठाचे ५५ इतर पक्षांचे मिळून एकूण ७५ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच अनेकजण शिवसेनेत पक्षात प्रवेशासाठी इच्छुक आहेत. हे सर्वजण सरकारच्या कामांवर विश्वास ठेवतात. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांवर आणि दिघे साहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रभागातील लोकांची कामे करण्यासाठी या लोकप्रतिनिधींनी हा निर्णय घेतला. त्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आपण स्वत: प्रयत्न करुन अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
हिंदुह्रदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारे शिवसैनिक मूळ शिवसेनेकडे परतले आहेत. गेल्या दोन वर्षात मुंबईतील हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिवसेनेकडे परतल्यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे तर दुसऱ्याबाजूला उबाठा गटाचे संस्थान खालसा होण्यास सुरुवात झाली आहे.