दिनांक – ०५/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पुण्यात जवळपास २०० हून अधिक ढोल-ताशा पथकं आहेत ,ज्यामध्ये अनेक तरुण-तरुणी सहभागी होतात. पण, आता या ढोल-ताशा पथकांमध्ये तृतीयपंथींच्या ढोल-ताशा पथकाचा समावेश होणार आहे. या पहिल्या तृतीयपंथी ढोल-ताशा पथकाचे नाव शिखंडी असे ठेवण्यात आलं आहे. या पथकाची स्थापना तृतीयपंथी समाज सेविका मनस्वी गोळकर यांनी केली. ट्रान्सजेंडर समाजाकडे भरपूर कौशल्ये आणि कलाकार आहेत, परंतु योग्य संधींच्या अभावामुळे हा समाज अजूनही मागे आहे, पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात हे तृतीयपंथी ढोल-ताशा वादनाचा सराव करतात.
शिखंडी ढोल-ताशा पथकातील तृतीयपंथी वादकांना नादब्रह्म पथकाने ढोल-ताशा वादनाचे प्रशिक्षण दिले आहे. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये या पथकाला आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली आहे.
१ सप्टेंबर रोजी शिखंडी ढोल-ताशा पथकाला शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात वादन करण्याची संधी मिळाली आहे. सध्या तृतीयपंथींच्या शिखंडी या ढोल-ताशा पथकाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान प्रत्यक्षात या पथकाचे वादन पाहण्याची आता सर्वांना उत्सुकता लागली आहे

Share.