दिनांक –०3/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महात्मा जोतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समितीच्यावतीने महात्मा ज्योतीबा फुले यांच्यावरील ग्रंथांचे इतर बहुजन कल्याण विभागाकडून पुनर्मुद्रण करण्याची मागणी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी केली होती. या मागणीला आज मान्यता देण्यात आली असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा जोतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समितीची आढावा बैठक (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) घेण्यात आली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव अशोक मांडे, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालक प्रकाश बच्छाव, समितीचे सदस्य उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, महात्मा जोतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समितीच्या हक्काला कोणतीही बाधा न होऊ देता. अटी आणि शर्तीच्या अधिन राहून, या ग्रंथांचे पुनर्मुद्रण करण्यात येणार आहे. तसेच पुनर्मुद्रण करताना कोणताही बदल न करता आहे तसे पुनर्मुद्रण करण्यास समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.