दिनांक –२७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, २७ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथून एका व्हिडिओ संदेशात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. नरेंद्र मोदी म्हणाले की, “माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या वृत्तामुळे आपल्या सर्वांच्या हृदयाला खोल जखम झाली आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन हे देशासाठी मोठे नुकसान आहे. फाळणीच्या त्या काळात खूप काही गमावून भारतात येणं आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवणे ही सामान्य कामगिरी नाही. प्रतिकूल परिस्थितीमध्येही यशाची उंची कशी गाठायची हे डॉ. मनमोहन सिंग यांचे जीवन भावी पिढ्यांना शिकवत राहील,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“डॉ. मनमोहन सिंग हे एक दयाळू व्यक्ती, अभ्यासू अर्थतज्ञ आणि सुधारणांना समर्पित नेते म्हणून नेहमीच स्मरणात राहतील. एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी भारत सरकारसाठी विविध स्तरांवर योगदान दिले. आव्हानात्मक काळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी उत्तम भूमिका बजावली. माजी पंतप्रधान आणि भारतरत्न श्री पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारमधील अर्थमंत्री या नात्याने डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले आणि नव्या आर्थिक मार्गावर नेले,” असे पंतप्रधानांनी म्हटले. पंतप्रधान या नात्याने देशाच्या विकासात आणि प्रगतीसाठी डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान सदैव स्मरणात राहील, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच पुढे नरेंद्र मोदी म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग यांची जनतेशी आणि देशाच्या विकासाप्रती असलेली बांधिलकी कायमच महत्त्वाची आहे.
Share.