दिनांक –१७/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सामान्यतः गणपती विसर्जनानंतर पितृ पक्षाला सुरुवात होते. दरवर्षी पितृ पक्ष भाद्रपद शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. तर अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावास्येला पितृ पक्ष समाप्त होतो. या वर्षी 17 सप्टेंबरपासून पितृ पक्ष सुरू होत आहे. तर 2 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्येला पितृ पक्ष समाप्त होईल. या दरम्यान, तिथी पाहून पूर्वजांचं श्राद्ध घातलं जाईल.
धार्मिक मान्यतेनुसार, पितृ पक्षाच्या काळात पितरं पृथ्वीवर वास करतात. यावेळी तृप्त किंवा अतृप्त अशा सर्व पितरांसाठी तर्पण, श्राद्ध, पिंडदान वगैरे केली जातात, यामुळे पितरांचा आत्मा शांत होतो.
यंदा पितृ पक्षावर चंद्रग्रहणाचं सावट
यंदा पितृपक्षावर चंद्र आणि सूर्य या दोन्ही ग्रहणांचं सावट राहील. यात 17 रोजी चंद्रग्रहण, तर 2 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण होईल. हे दोन्ही ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे या ग्रहणाचा सुतक काळ मानला जाणार नाही. असं असलं तरी, ज्योतिष शास्त्रानुसार, पितृपक्षावर ग्रहणांचा परिणाम होऊ शकतो. कारण 15 दिवसात दोन ग्रहणं शुभ मानली जात नाहीत.
चंद्रग्रहणाचा मोक्षकाल संपल्यानंतर, म्हणजेच 18 सप्टेंबरपासून श्राद्ध, तर्पण, पिंडदान हे विधी सुरू करावे. या दिवसापासूनच खऱ्या अर्थाने पितृपक्ष ग्राह्य धरला जाईल. तर श्राद्ध पक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबरला तुम्ही श्राद्धविधी करू शकाल, कारण या दिवशीचं ग्रहण रात्री होणार आहे आणि भारतात ते दिसणार नाही.
पितृ पक्ष 2024 महत्वाच्या तारखा
पंचांगानुसार, दरवर्षी भाद्रपद मासात पितृपक्ष प्रारंभ होतो आणि तो 16 दिवस राहतो. याच कालावधीत पितरांच्या शांतिसाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान केलं जातं. या काळात श्राद्ध घातल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो, तसेच व्यक्ती पितृदोषापासून मुक्त होतो आणि त्याच्या घरात सुख-समृद्धी नांदते. त्यासाठी पुर्वजांच्या मृत्यू तिथीनुसार श्राद्ध घातले पाहिजे, यानुसार काही महत्त्वाच्या तारखा जाणून घेऊया.
प्रष्टपदी/पौर्णिमा श्राद्ध: मंगळवार 17 सप्टेंबर
प्रतिपदा श्राद्ध : बुधवार 18 सप्टेंबर
द्वितीयेचे श्राद्ध : गुरुवार 19 सप्टेंबर
तृतीयेचे श्राद्ध : शुक्रवार 20 सप्टेंबर
चतुर्थी श्राद्ध : शनिवार 21 सप्टेंबर
पंचमी श्राद्ध : रविवार, 22 सप्टेंबर
षष्ठीचे श्राद्ध आणि सप्तमीचे श्राद्ध: सोमवार 23 सप्टेंबर
अष्टमी श्राद्ध : मंगळवार 24 सप्टेंबर
नवमी श्राद्ध : बुधवार 25 सप्टेंबर
दशमी श्राद्ध : गुरुवार 26 सप्टेंबर
एकादशी श्राद्ध: शुक्रवार 27 सप्टेंबर
द्वादशीचे श्राद्ध : रविवार 29 सप्टेंबर
माघाचे श्राद्ध : रविवार 29 सप्टेंबर
त्रयोदशीचे श्राद्ध : सोमवार 30 सप्टेंबर
चतुर्दशीचे श्राद्ध : मंगळवार 1 ऑक्टोबर
सर्व पितृ अमावस्या : बुधवार 2 ऑक्टोबर