दिनांक – ०६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्रातील शिक्षणाचा दर्जा वाढून गुणवंत महाराष्ट्र घडविण्यात शिक्षकांचे योगदान मोलाचे असणार आहे. यासाठी शासनामार्फत विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येत असल्याचे सांगून मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी शालेय शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले, शिक्षकांसाठी टप्पा अनुदान लागू करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे. डिसेंबर ऐवजी जून महिन्यापासून हा टप्पा लागू करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच निर्णय घेण्यात येईल. शिक्षक भरतीला सुरूवात करून पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. ग्रंथपाल, शिक्षण सेवक यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात आले आहेत. शिक्षकांच्या निवृत्ती वेतनाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून त्यांना यापुढे निवडणूक आणि जनगणनेव्यतिरिक्त अशैक्षणिक कामे देण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले, शासनाने सर्व विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला आहे. आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बूट आणि सॉक्स देण्याचा निर्णय घेण्यात आला. पोषण आहारात अंडी, केळी, तृणधान्य देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा तसेच शेतीची माहिती व्हावी यासाठी परसबाग योजना राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यात आले. व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात येत असून जर्मनीमध्ये रोजगारासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महावाचन उत्सव अभियानाअंतर्गत एक लाख शाळा आणि एक कोटी विद्यार्थी सहभागी होतील असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

श्रीमती कुंदन मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, शिक्षक हे समाजाचे आधारस्तंभ आहेत. आज आपण १०९ शिक्षकांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करीत आहोत. राज्यातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला, ही अभिमानाची बाब असल्याचे सांगून शालेय शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमात शिक्षक हे नेहमीच स्वयंस्फूर्तीने काम करतात, त्यांना वेळोवेळी येणाऱ्या अडचणीही विभागामार्फत सोडविण्याचे काम केले जात असल्याचे त्या म्हणाल्या.

श्री.मांढरे यांनी प्रास्ताविकाद्वारे शिक्षक पुरस्काराविषयी माहिती दिली. शिक्षक कधीच माजी होत नाहीत. ते विद्यार्थ्यांसाठी कायम माझे शिक्षकच राहतात, असे त्यांनी सांगितले. अनेक शिक्षकांनी विविध क्षेत्रात विक्रम प्रस्थापित केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने दरवर्षी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

Share.