दिनांक – ०४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ई-गव्हर्नन्स हा शासनाचा आत्मा असून ई-गव्हर्नन्समुळे कामे अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होण्यास मदत होत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर येथे आयोजित 27 व्या राष्ट्रीय गव्हर्नर परिषदेत ते बोलत होते.यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, माहिती तंत्रज्ञानचे प्रधान सचिव पराग जैन यांच्यासह केंद्रीय सचिव व्ही.श्रीनिवास, सचिव एस. कृष्णन, अतिरिक्त सचिव पुनीत यादव उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबई फक्त आर्थिक, मनोरंजन, सांस्कृतिक राजधानी नसून आता एक टेक्निकल राजधानी व्हायला हवी अशी आशा व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई भारताची फायनान्स टेक्नोलॉजीकल (fintech) राजधानी व्हावी असे म्हटले याची आठवण देखील उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.

राज्य शासनाने ‘आपले सरकार’ हे पोर्टल २०१४ रोजी सुरू केले. सेवांच्या अधिकाराखाली अनेक सेवा या डिजिटल पोर्टलवर आणल्या. समाजातील कोणताही घटक सेवांपासून वंचित राहू नये असे याचे उद्दिष्ट आहे. आपले सरकार या पोर्टलचा वापर राज्यातील लोक मोठ्या प्रमाणावर करतात. आपले सरकार या पोर्टलकडून नागरिकांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि त्यामुळे नागरिक संतुष्ट असल्याचे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, सध्याच्या युगात डेटा अतिशय मौल्यवान आहे. त्याचबरोबर या डेटाचे जतन, संरक्षण करण्यासाठी नवीन साधने आणणे गरजेचे आहे. ई गव्हर्नन्समुळे शासन अधिक कार्यक्षम झाले आहे. तसेच नागरिकांचे आयुष्य सहज आणि सुलभ झाले. डिजिटल युगामुळे ई – गव्हर्नन्सला अधिक वेग मिळत आहे. कामाचा दर्जा वाढला आहे. नागरिकांची कामे सहज सुलभ होण्याबरोबरच वेळेचीही बचत झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध राज्यांच्या प्रतिनिधींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.

0000

Share.