दिनांक – ०५/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सागरी सेतूवरून प्रवास सुखकारक झाला आहे. मात्र या पुलावरून उडी मारून जीव देण्याच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अटल सेतूवरून आत्महत्या करणाऱ्या महिलेला कॅब चालक आणि पोलिसांनी वाचविल्याचा व्हिडिओ वायरल झाला होता.
आज पुण्याच्या एका बँकरने अटल सेतूवरून समुद्राच्या पाण्यात उडी मारून आपलं जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे अटल सेतू चर्चेत आला आहे.
३५ वर्षीय बँकर अॅलेक्स हा पिंपरीत राहणारा असून कंपनीच्या मिटींसाठी तो मुंबईला गेला होता. मुंबईत राहणाऱ्या सासऱ्याचीही त्याने भेट घेतली होती. तेथून पुण्याला परतत असताना त्याने अटल सेतूवरून उडी मारली आणि आयुष्य संपविले. कामाच्या ताणातून त्याने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. वरिष्ठांनी त्याच्यावर कामचा दबाव टाकल्याने त्याने आत्महत्या केली असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच याची कसून चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.