दिनांक –०९/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ९० च्या दशकात संतोषनगर,शिवसेना शाखेच्याजवळ उल्हासनगर ०४ येथे परिसरातील पटांगणात घरोघरी वर्गणी गोळा करून दहा दिवसाचा सार्वजनिक मंडळाचा गणपती बसवण्याची प्रथा सुरू झाली.

सन ८१ ते ८९ सालापर्यंत गणेशोत्सव कालावधीत दरवर्षी नवं-नवीन देखाव्याचे डेकोरेशन असायचे. गणेशोत्सव कालावधीत प्रत्येक घरातून दर दिवशी वेगवेगळा प्रसाद तयार केला जायचा. गुण्यागोविंदाने सार्वजनिक मंडळाच्या गणपतीचा गणेशोत्सव साजरा होत होता. दहा दिवसांच्या कालावधीत गणेशोत्सव पटांगणात भजन, कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले जायचे. तसेच परिसरातील सर्व परिवारांसाठी पडद्यावरील चित्रपटाचेही आयोजन केले जात होते. गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन केलेले असायचे. त्यावेळेस सर्व भाविक सत्यनारायणाच्या पूजेचा अन् प्रसादाचा लाभ घेत असत. अकराव्या दिवशी जड अंत:करणाने मंडळाचे कार्यकर्ते सदस्य बाप्पाचे विसर्जन करत होते. कालांतराने मंडळातील कार्यकर्ते कोणी कामानिमित्त कोणी इतर कारणास्तव संतोषनगरचा परिसर सोडून इतर ठिकाणी स्थायिक झाले. तसेच जागे अभावी दरवर्षी गणपती स्थापनेची जागा बदलत होती. कार्यकर्त्यांची कमी भासत होती त्यामुळे मंडळातील सदस्यांनी पुढील वर्षीपासून आपण गणपतीची स्थापना करायची नाही असे ठरवले होते.पण गणपती स्थापनेची प्रथा मोडू नये याकरता संतोषनगर परिसरात स्थायिक असलेल्या पुजारी परिवाराने सदर मंडळाचा गणपती हौसे खातर पुढील वर्षीपासून म्हणजेच ९० सालापासून आपल्या घरात बसविण्याची ठरविले. सार्वजनिक मंडळांच्या गणपतीची विधिवत स्थापना पुजारी परिवारात ९० सालापासून करण्यास सुरुवात झाली.

पुजारी परिवाराचा मूळ गौरी-गणपतीचा उत्सव त्यांच्या मूळ घरात म्हणजे गावी सालाबादाप्रमाणे होत आहे. गेल्या ३४ वर्षांपासून उल्हासनगर येथे पुजाऱ्यांच्या घरी बाप्पा विराजमान होत आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी घरातील महिलावर्ग हरतालिका मातेची विधिवत पूजा अर्चा करतात. दुसऱ्या दिवशी बाप्पांचे आगमन झाल्यावर हरतालिका मातेच्या पूजेचे विसर्जन करतात. ९० ते २००० च्या दशकात थर्माकोलचे रेडिमेड मंदिर आणून सॅम्पल नुसार आम्ही मोठ्या उत्साहात थर्माकोलचे मंदिर बनवायचो. घरात गणपती विराजमान झाल्यापासून गौरी विसर्जना दिवशीच आम्ही गणपती बाप्पांचे ही विसर्जन करण्याची प्रथा सुरू केली.

विसर्जनाच्या आदल्या दिवशी सत्यनारायणाची पूजेची प्रथा आजतागायत दरवर्षी नित्यनियमाने सुरू आहे. बाप्पा येणार म्हटलं की सर्वांच्या आनंदाला पारावार नसतो हे खरंच आहे. असेच काही आमच्या घराण्यातही आहे. आत्ताची पिढी तीन महिने अगोदरच बाप्पांच्या आगमनाच्या तयारीची सुरुवात करते. दरवर्षी जुन्याच डेकोरेशन मधून नवीन युक्तीने नवनवीन पद्धतीचे डेकोरेशन तयार करण्याचा आमचा मानस असतो. लाकडी बॅटनचे डेकोरेशन, कधी फुलाचे डेकोरेशन, कधी पडद्यांचे डेकोरेशन, सध्याच्या ट्रेंड नुसार ग्रास डेकोरेशन अशा पद्धतीचे नवनवीन डेकोरेशन आम्ही करत असतो. एखाद्या वर्षी घरातील सर्व पुरुष मंडळी साठी टी-शर्ट छपाई, तर कधी एकाच कलरचा झब्बा विकत घेणे, तसेच महिला वर्गासाठी एकाच कलरच्या साड्या किंवा ड्रेस घेणे. पुजाऱ्यांच्या राजा बाप्पा माझा नावाची गांधी टोपी, पुजाऱ्यांच्या राजा बाप्पा माझा नावाचे पताका, पुजाऱ्यांच्या राजा बाप्पा माझा नावाचे लॉकेट ,पुजाऱ्यांच्या राजा बाप्पा माझा नावाचे बिल्ले, पुजाऱ्यांच्या राजा बाप्पा माझा नावाचे गाणे , पुजाऱ्यांच्या राजा मोरया या नावाची आरती इतर काही गोष्टी आम्ही अत्यंत आवडीने करत असतो आणि या पुढे हि करत राहू.

गेल्या नऊ वर्षापासून डेकोरेशनच्या वरील भागावर नवनवीन युक्तीने चारोळी/ स्लोगन बॅनरचे डेकोरेशन करतो त्याचे आकर्षण काही वेगळेच असते. हा जो आनंद आहे खरं म्हणजे शब्द संपतील तरी न संपणारा आहे. पुजाऱ्यांच्या घरी दरवर्षी चारोळी हा गणपती डेकोरेशन मधील एक अविभाज्य घटक बनला आहे. गेल्या १० वर्षापासून बाप्पाचे फोटो स्थानिक वृत्तपत्रात येत आहेत. हळूहळू बाप्पाला “पुजाऱ्यांचा राजा बाप्पा माझा” अशी नवीन ओळख मिळत आहे.

गणेशोत्सवातील महत्त्वाचा भाग म्हणजे गौरी आगमन सोहळा आमच्या मूळ गावच्या घरी गौरी गणपती असतात.गावी सुद्धा गौरी गणपतीचा उत्सव माझ्या घरातील सदस्य चांगल्या रीतीने साजरा करतात. त्यामुळे उल्हासनगर येथे गौरी बसत नाहीत. पण गौरी मातेसाठी लागणारा सर्व नैवेद्य तयार करतात. आमच्या घरापासून जवळ असलेल्या आमच्या आत्याच्या घरी म्हणजे मोरे परिवारात गौरी असतात तिथे जाऊन गौरी मातेची विधिवत पूजा अर्चा करतात. पहिल्या दिवशी गौरीला भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो.ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व नैवेद्य दाखवितात. गौरी मातेला गोडाधोडाचे जेवण केले जाते. गौरी आपल्याकडे माहेरवाशीण म्हणून आल्याने त्यांना खाण्यासाठी लाडू, चिवडा, करंज्या असे फराळाचे पदार्थ, मिठाई, फळे यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. तसेच गौरीला विविध प्रकारची फुले आणि पत्री वाहण्यात येतात. संध्याकाळी नातेवाईक, शेजारी आणि मित्र-मैत्रिणींना हळदी-कुंकवासाठी आणि गौरींचे दर्शन घेण्यासाठी बोलविण्यात येते.रात्रीच्या वेळेस गौरीची गाणी गात गौरीचा जागर करतात.

गावच्या रितीप्रमाणे पुजाऱ्यांच्या घरात आरती बोलण्याचा अंदाज हा काही वेगळाच आहे.आरतीच्या वेळेस जमलेल्या भक्तगणात दोन भागात विभागून डबल आरती बोलण्याची पद्धत येथे सुरू आहे. सत्यनारायण पूजेच्या दिवशी सर्व मित्रपरिवार, स्थानिक राजकीय नेते आवर्जून बाप्पाच्या दर्शनास येतात.

विसर्जनाच्या दिवशी आम्ही हातगाडी सजवून त्यावर बाप्पांना आसनस्थ करून फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशाच्या गजरात परिवारातील व परिसरातील सर्व मंडळी बेधुंद होऊन नाचत नाचत बाप्पांना विसर्जन घाटाकडे घेऊन जातात. तेथे विधिवत आरती करून अतिशय जड अंत:करणाने, “पुढच्या वर्षी लवकर या” अशा जयघोषात भाव विभोर होऊन त्यांना निरोप देतो.

हे दिवस येतात आणि इतक्या पटकन् भुर्रकन उडून जातात की असं वाटतं, जर मी हे क्षण अजून अनुभवू शकलो तर माझ्यासारखा नशीबवान मीच.आमचे बाप्पा आमचा आनंद आहे, त्यांची निरंतर सेवा करायला मिळो हि मनःपूर्वक सदिच्छा आहे. “येथे कर माझे जुळती”

Share.