दिनांक –१२/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या निवासस्थानी, राजभवन येथे स्थापन केलेल्या गणरायाचे बुधवारी (दि. ११) गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी राजभवन येथे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.

राज्यपालांनी कुटुंबातील सदस्य तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांचेसह गणरायाची आरती केल्यानंतर बाप्पाला निरोप दिला. राज्यपालांच्या सूचनेनुसार गणेश मूर्तीचे समुद्रात विसर्जन न करता कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. गणेशमूर्ती विसर्जन करताना पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी मूर्तीचे समुद्रात विसर्जन न करता ते कृत्रिम हौदात करावे अशी सूचना राज्यपालांनी केल्यामुळे मूर्तीचे विसर्जन हौदात करण्यात आले.

शाडूची मूर्ती; नाशिक मध्यवर्ती कैद्यांनी केली निर्मिती
राज्यपालांच्या निवासस्थानी मांडलेली गणेशाची मूर्ती शाडूची होती व ही मूर्ती नाशिक येथील कारागृहातील कैद्यांनी तयार केली होती. विसर्जनाचे वेळी राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे, सहसचिव श्वेता सिंघल, परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Share.