दिनांक –०3/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्यात 2 वर्ष 3 महिन्यांमध्ये 40 हजाराहून अधिक रुग्णांना 340 कोटी रुपयांची वैद्यकीय मदत देणे हे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे काम कौतुकास्पद असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृहात आयोजित दुर्धर व गंभीर आजारांवर यशस्वी मात केलेल्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाअंतर्गत रूग्णांचा लाभार्थ्यांच्या आनंद मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार सदाभाऊ खोत, सत्यजित तांबे, व्याख्याते गणेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
अॅड राहुल नार्वेकर म्हणाले, सामान्य माणसाला मोफत उच्च गुणवत्तापूर्ण रुग्णसेवा मिळणे आवश्यक असते. मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सक्षमपणे काम करत असून कक्षातील सर्व अधिकारी-कर्मचारी कार्यकर्ते यांच्यामुळे राज्यात रुग्णसेवेचे चांगले काम सुरू असून देशात महाराष्ट्र सर्वात जास्त रुग्णांसाठी आर्थिक सहाय्य करणारे राज्य आहे.
सामान्य जनतेला रुग्णसेवा दिली तर तोच खरा आनंद असतो यापेक्षा दुसरा आनंद असू शकत नाही. रुग्णसेवा ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. 2 वर्षामध्ये 600 पेक्षा जास्त रूग्णालय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाशी जोडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णांना सहाय्य करुन निस्वार्थ समाजसेवा करत आहेत, असे अॅड. नार्वेकर यांनी सांगितले.
डॉ. नीलम गोरे म्हणाल्या, धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी राखीव बेड ठेवलेले असतात, परंतु त्याची माहिती गरजू रुग्णांना माहिती नसते. यासाठी वेबसाईटवर माहिती उपलब्ध करून देण्यात आली पाहिजे. आरोग्य क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, अधिकारी-कर्मचारी यांच्या अनेक समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी ही काम करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे हे अतिशय महत्त्वाचे काम करत असून ते हे काम समाजसेवा म्हणून करत आहेत. आरोग्य क्षेत्रातील त्यांचे काम अतूलनीय आहे.
वाढदिवसासारख्या विविध कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाबद्दलची माहिती जाणे आवश्यक आहे. जेणेकरून दुर्धर आजाराचे रुग्ण, आर्थिक परिस्थिती नसणाऱ्यांना आर्थिक साह्य मिळण्यास मदत होईल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना अशा शासनाच्या विविध योजनांचाही माहिती आपल्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजेत असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातील अधिकारी कर्मचारी यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल स्मृतीचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. नाशिक येथील पडसाद कर्णबधिर दिव्यांगाच्या विद्यार्थी संस्थेला 50 हजारांचा धनादेश ॲड. नार्वेकर यांच्या हस्ते देण्यात आला. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून ज्या रूग्णांना आर्थिक मदत झाली अशा रूग्णांनी आणि रुग्णांच्या नातेवाइकांनी मदतीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आणि कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचे आभार मानले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री चिवटे यांनी प्रास्ताविकात आजपर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष अंतर्गत करण्यात आलेल्या मदतीबद्दल सविस्तर माहिती दिली.