दिनांक –१४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- उत्सव काळादरम्यान मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी लक्षात घेता, यात भेसळ होण्याच्या घटना वाढण्याची शक्यता असते. यामुळे ग्राहकांचे आरोग्य लक्षात घेता, अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा (FSSAI) ने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना उत्पादन आणि विक्रीवर कठोर नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणच्या निर्देशानुसार, उत्सवांच्या काळात मिठाई, फरसाण, दूध आणि दुग्धजन्य उत्पादने जसे की तूप, खोवा आणि पनिर यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या वाढलेल्या मागणीमुळे काही वेळा काही उत्पादक या वस्तूंमध्ये भेसळ करतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एफएसएसएआय ने विशेष देखरेख आणि अंमलबजावणी मोहिमा राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

विशेष देखरेख आणि उपाययोजना
प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिठाई, फरसाण आणि दुग्धजन्य उत्पादने यांची निर्मिती आणि विक्रीवर काटेकोर देखरेख ठेवावी, असे एफएसएसएआय चे निर्देश आहेत. नियमित अंमलबजावणी मोहीमा राबवून संभाव्य भेसळ रोखण्याचे निर्देश दिले आहेत.यासोबतच, ज्या बाजारपेठांमध्ये भेसळीच्या घटना घडण्याची शक्यता आहे, तिथे फूड सेफ्टी ऑन व्ह‍िल्स (FSW) युनिट्स तैनात करावेत, असे प्राधिकरणाचे निर्देश आहेत. या युनिट्समुळे अन्न सुरक्षा नियमांचे पालन होईल आणि ग्राहकांना सुरक्षित अन्न मिळू शकेल.

Share.