दिनांक – ०३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- विकासामध्ये जोपर्यंत महिलांची भागीदारी वाढत नाही तोपर्यंत आपल्याला विकास करता येणार नाही. सहकारातून क्रांती घडू शकते. याचे खरं मॉडेल वारणानगरमध्ये येवून लोकांनी पहावं म्हणूनच येथील झालेल्या कामाबद्दल सहकार महर्षी स्व.तात्यासाहेब कोरे यांना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी शासनाकडून पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले, वारणा समूहामध्ये साखर कारखाना, दुग्ध उत्पादन, शिक्षण मंडळ, वीज निर्माण संस्था, सहकारी बँक, महिलांची बँक, शेती प्रशिक्षण संस्था, सहकारी बँक, महिलांची पतसंस्था, व्यायाम मंडळ, भगिनी मंडळ, सहकारी ग्राहक चळवळ, महिला औद्योगिक सहकार चळवळ, वारणा बाजार इ. विविध क्षेत्रामध्ये झालेली क्रांती थक्क करणारी आहे. आज वारणा समूहात तीन हजार कोटींच्या घरात उलाढाल होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महिला जोपर्यंत अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू होणार नाहीत तो पर्यंत विकसित भारताचेही स्वप्न पूर्ण करता येणार नाही. महिलांना सक्षम करण्यासाठी केंद्र व राज्य शासन पाठिंबा देत असून लखपती योजना, लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना, मोफत शिक्षण, मोफत एसटी प्रवास या योजनेतून त्या अधिक सक्षम होत आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वारणा समूहाचे प्रमुख तथा आमदार डॉ.विनय कोरे यांनी प्रास्ताविक करताना भारताचे राष्ट्रपती सार्वजनिक कार्यक्रमात पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यात आल्याने त्यांचे आभार मानले. तसेच त्यांनी वारणा विद्यापीठास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याबद्दल राज्य शासनाचे आभार मानले. त्यांनी प्रास्ताविकामध्ये वारणा समूहाबद्दल उपस्थितांना माहिती दिली.वारणा समूहातील कार्यरत महिलांनी राष्ट्रपतींना शिवराज्याभिषेक तेलचित्र भेट म्हणून दिले. तर सावित्री महिला सहकारी संस्थेच्या संचालक शुभलक्ष्मी कोरे यांनी राष्ट्रपती महोदयांचे कोल्हापुरी अलंकार व साडी देवून स्वागत केले. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

Share.