दिनांक –१६/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये सर्व शासकीय विभागांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन समन्वयाने काम करावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राजेश देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, अपर पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मी नांदेडकर, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बढे, निवासी उजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे यांसह विविध समित्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त राजेश देशमुख मार्गदर्शन करताना म्हणाले की, निवडणूकीतील प्रत्येक दिवस महत्वाचा असून ही निवडणूक इतर निवडणूकीपेक्षा वेगळी आहे. निवडणूक आयोगाने आपल्याला ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे. मतांची टक्केवारी वाढावी यासाठी दिव्यांग मतदार, 85 वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिक यांना आयोगाने घरून मतदान करण्याची (होम वोटिंग) सुविधा दिली आहे. दिव्यांग मतदारांचे 100 टक्के मतदान होईल या दृष्टीने नियोजन करावे. दिव्यांगांना सहजतेने मतदान करता यावे यासाठी त्यांना द्यावयाच्या सुविधा सर्व मतदान केंद्रांपर्यंत उपलब्ध करण्यात याव्यात. तसेच मतमोजणी झाल्यानंतर व्हीव्हीपॅट व ईव्हिएम मशीन स्ट्राँगरुममध्ये व्यवस्थितपणे ठेवण्याची योग्य ती दक्षता घेण्यात यावी. मतदानावेळी एखादी मशीन बंद पडल्यास ती मशीन तात्काळ दुरुस्त करण्याची कार्यवाही झाली पाहिजे याकडे विशेष लक्ष द्यावे. सर्व यंत्रणानी लोकसभा निवडणूक-2024 मध्ये अत्यंत चांगल्या पध्दतीने काम केल्याबद्दल विभागीय आयुक्त श्री.देशमुख यांनी सर्वांचे अभिनंदन केले. मागील निवडणुकीच्या तुलनेत या निवडणूकीतील मतदान अधिक व्हावे, या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. निवडणुकीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. कायदा व सुव्यवस्था व पोलीस बंदोबस्त आराखडा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात यावा. मतदान जनजागृती, अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाबाबतही निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
पोस्टल व होम वोटिंग द्वारे होणारे मतदान मतपत्रिकेवर होत असून या दृष्टीने यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांनी काळजीपूर्वक काम करावे. सी-व्हीजील, आचारसंहिता कक्ष, जिल्हा निवडणूक सनियंत्रण कक्ष याकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी सोडविण्यासाठी सतर्कता राखावी, अशा सूचना विभागीय आयुक्त श्री. राजेश देशमुख यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे निवडणूक विषयक विविध समितीनिहाय कामकाजाची माहिती दिली. जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता कक्ष, मतदार जागृकता व सहभागिता कार्यक्रम (स्वीप), सी व्हिजील ॲप, सक्षम ॲप, ईव्हीएम, 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार यांचे मतदान, पोस्टल मतदान व होम वोटिंग प्रक्रिया, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र सरमिसळ प्रक्रिया, सूक्ष्म निवडणूक निरीक्षक प्रशिक्षण यासह विविध बाबींची माहिती दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये कायदा व सुव्यवस्था व पोलीस बंदोबस्त आराखडा बाबतची माहिती दिली.