दिनांक –१३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- रायगड जिल्हयामधील महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजने अंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या (विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या) परंतु, आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतक-यांसाठी आधार प्रमाणिकरण करुन घेणे करीता महा-आयटी यांनी दिनांक १८ सप्टेबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
या कालावधीत संबंधीत शेतकरी लाभार्थ्याने आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. या योजने अंतर्गत जिल्हयातील सर्व बँकांनी प्रोत्साहनपर लाभासाठी ३०३६५ इतक्या कर्जदार लाभार्थ्याची खाती अपलोड केली आहेत. त्यापैकी १७९८२ इतक्या लाभार्थी शेतक-यांना विशिष्ट क्रंमाक प्राप्त झाले आहेत. आणि त्यापैकी १७६८१ इतक्या लाभार्थी शेतक-यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले असून अद्याप १८१ शेतकरी लाभार्थी यांचे आधार प्रमाणिकरण करणे प्रलंबित आहे. आधार प्रमाणिकरण केलेल्या लाभार्थी शेतक-यापैकी १६७४४ पात्र लाभार्थी शेतक-यांच्या खाती रु.६९.९९ कोटी इतकी रक्कम शासनामार्फत अदा करण्यात आली आहे,
या संबंधित राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक व ग्रामिण बँकानी देखील लाभार्थी शेतक-यांना व्यक्तीशः कळवावे. योजनेंतर्गत पात्र परंतु आधार प्रमाणिकरण झाले नाही, अशा १८१ शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण तात्काळ करुन घ्यावे असे आवाहन जिल्हयाचे जिल्हा उपनिबंधक श्री. प्रमोद का. जगताप यांनी केले आहे.