दिनांक – ०५/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पर्यावरण व शाश्वत विकासासाठी महाराष्ट्रात होत असलेल्या कामांची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सन्मान जागतिक कृषि परिषदेचे पदाधिकारी स्वतः महाराष्ट्रात येऊन करणार आहेत, ही गोष्ट महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी अभिमानाची आहे. आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधत जागतिक कृषि परिषदेच्या वतीने या कार्यक्रमाचे 18 सप्टेंबर 2024 रोजी मुंबईतील एन सी पी ए सभागृहात आयोजन करण्यात आले आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ‘मंत्रालय व विधीमंडळ पत्रकार कक्ष’ सभागृह येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. राष्ट्रीय बांबू मिशनचे सदस्य व राज्य टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
यापूर्वी हा सन्मान सोहळा वॉशिंग्टन डीसी येथे आयोजित केला होता. परंतु कार्य बाहुल्यामुळे तेथे येण्यास मुख्यमंत्र्यांनी असमर्थता दर्शवल्याने परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे येऊन आम्ही मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू, अशा पद्धतीने विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. मुंबई येथे होणाऱ्या सन्मान सोहळ्यासाठी 18 सप्टेंबर 2024 रोजी जगातील विविध 20 देशांचे फोरमचे पदाधिकारी आणि 20 देशांचे भारतातील दूतावासात नियुक्त राजनीतिक उच्चाधिकारी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा सत्कार सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी पर्यावरण व शाश्वत विकास टास्कफोर्सची स्थापना केली असून त्याचे अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्री श्री. शिंदे असून अंमलबजावणीसाठी कार्यकारी अध्यक्षपदी पाशा पटेल यांना नेमले आहे. संबंधित सचिव यांचे कार्यकारी मंडळ तयार करण्यात आले आहे. औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये 5% बायोमास वापरायचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. त्यासाठी 21 लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी एक लाख वीस हजार एकर क्षेत्रामध्ये बांबू लागवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या याच प्रयत्नांमुळे ॲगीकल्चर टुडे या संस्थेने मुख्यमंत्री श्री.शिंदे यांचा दिल्लीमध्ये नुकताच सन्मान केला आहे. त्याची दखल आता थेट जागतिक पातळीवर घेण्यात आली व वर्ल्ड एग्रीकल्चर फोरमने पुढाकार घेऊन जागतिक स्तरावर मुख्यमंत्र्यांच्या कामाची दखल घेतली आहे.
कृषी क्षेत्रातील प्रगतीच्या अनुषंगाने भविष्यातील धोरण आणि जागतिक स्तरांवर होत असलेल्या कामांची दखल घेऊन जागतिक पुरस्कारासाठी जगातील विविध देशातून नामांकन विचारात घेण्यात येतात. जागतिक परिणामकारक वनस्पती विज्ञान, कृषी विषयक विविध पैलूंबद्दल माहिती घेताना उत्पादन, व्यापार, तंत्रज्ञान, व्यवसाय, धोरण आणि आर्थिक परिस्थिती, पोषण, अन्न प्रक्रिया, पाणी आणि पर्यावरण या व्यापक बाबींचा समावेश करते.यासाठी योग्यता आणि पूर्णतेसाठी नामांकनांचे पुनर्विलोकन करून, ते निवडीसाठी पाठवले जातात. निवड समिती नंतर नामांकनांचे पुनर्विलोकन करते आणि प्राप्तकर्त्याची शिफारस करते.
पाशा पटेल म्हणाले, संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटेनियो गुटेरस यांनी वातावरण बदलाबद्दल सगळ्या जगाला आवाहन केले आहे.” तापमान वाढीचे युग संपले असून होरपळ युग सुरू झाले आहे आता तातडीच्या कृतीची गरज आहे, ” या त्यांच्या आवाहनाला जगभरातून भारत देशाने आणि भारतामध्ये महाराष्ट्र राज्याने सर्वप्रथम प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यासाठी पहिले पाऊल टाकले. तापमान वाढ, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हरित महाराष्ट्राची संकल्पना त्यांनी मांडली.
येत्या बुधवारी 18 सप्टेंबर 2024 रोजी मुंबईतील या कार्यक्रमाचे आयोजन फिनिक्स फाउंडेशन लोदगा, जिल्हा लातूर यांनी केले असून 18 सप्टेंबर या आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधून हा महत्त्वाचा कार्यक्रम एनसीपीए सभागृहात सकाळी 11 वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत भरगच्च चर्चासत्रांनी पार पडणार आहे. यामध्ये जगभरातील या विषयातले तज्ञ उपस्थितांना मार्गदर्शन करतील. त्याच दिवशी संध्याकाळी सहा ते नऊ या वेळात मुख्य सत्काराचा कार्यक्रम पार पडेल.